कणकवली
सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान तर्फे यावर्षी पासून दिला जाणारा पहिला सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार-२०२१ दिशा शेख यांच्या “कुरूप” या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. दिशा शेख या श्रीरामपूर,अहमदनगर येथील असून साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे.
कुरूप मधील काव्य हे दुःखाचे खरेखुरे हृदयद्रावक प्रकटीकरण आहे. तृतीयपंथी हे समाजाचेच घटक असूनही ते नेहमीच दुर्लक्षित आणि वंचित राहिले आहेत. त्यांच्या जगण्याचं वास्तव प्रतिबिंब ज्यात उमटलं आहे, अशा कुरूपला हा पुरस्कार जाहीर करून तृतीयपंथीयांना समाजात माणूस म्हणून चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा हा सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठानचा उद्देश आहे, असा मनोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश पवार यांनी व्यक्त केला.
रोख रक्कम रु. १०,००० आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार १ मार्च २०२२ ला सदाशिव पवार गुरुजी यांच्या जयंतीदिनी उचल्याकार – लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते आणि समाजसेवक श्री. संदीप परब, लेखिका वैशाली पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे समारंभ पुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार निवडीसाठी डॉ. भा. वा. आठवले, वैशाली पंडित, डॉ. मिलिंद शेजवळ, प्रसाद कुलकर्णी आणि विजय शेट्टी या मान्यवरांचा सल्ला घेण्यात आला.