वैभववाडी
प्रत्येक कवीमध्ये एक नाटककार दडलेला असतो. मालवणी मातीचा सुगंध मिळाल्यास काव्यसंग्रह हा बहारदार होत असतो. मालवणी भाषेने माझ्यासारख्या एका साहित्यिकाला खूप काही दिले आहे. ‘गावय’ हा काव्यसंग्रह वाचून एवढ्या मोठ्या उच्च विचारसरणी चा कवी वैभववाडीत असल्याचा फार आनंद झाला आहे. मालवणीच वैभव या काव्यसंग्रहातून कवी चेतन बोडेकर यांनी खुलवीले आहे. असे गौरवोद्गार 96 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी काढले.
कवी चेतन बोडेकर लिखित अस्सल मालवणी ‘गावय’ या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मालवणी नाटककार श्री. गंगाराम गवाणकर यांच्या शुभहस्ते कोकिसरे येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर 9 वे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर, कवी प्रा. डॉ. नामदेव गवळी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी आर.डी. बोडेकर, कवी चेतन बोडेकर, राजेंद्र लाड, प्रा. एस. एन. पाटील, नगरसेवक संतोष माईनकर, संदीप शेळके, दिनेश जंगले, श्रीम. आनंदी बोडेकर, दशरथ शिनगारे, कविता जंगले , सविता शेळके, व शिक्षक, कवी, ग्रामस्थ उपस्थित होते.
गंगाराम गवाणकर म्हणाले, हा काव्यसंग्रह वाचून खूप आनंद झाला. या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया. जसा काव्यसंग्रह बोडेकर यांनी लिहिला. तसेच त्यांनी लवकर मालवणी नाटक लिहावे. कारण त्यांच्या प्रत्येक काव्यात नाट्य आहे असे सांगितले. मधुसूदन नानिवडेकर म्हणाले, गझल आणि गझाली यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. गझल लिहिण्यासाठी जीवनावर प्रेम करावं लागतं. चेतन बोडेकर यांच्या काव्यसंग्रहाला तांबळ मातीचा सेंद्रिय गंध मिळाला आहे. चेतन यांनी कविता लिहित राहाव्यात.
माझ्या पुढील प्रवासात हा कवी माझा सोबती असेल. यापुढे मी कवी चेतन बोडेकर यांना सोबत घेऊन पुढे जाईल असे अभिवचन त्यांनी दिले. चेतन बोडेकर म्हणाले, मालवणी कवितेचा प्रारंभ महाविद्यालयीन काळापासून सुरू केला. मालवणी भाषेची गोडी, कोकणातील जीवनपद्धती, रीतीरिवाज, सण, उत्सव, लोकांची व्यथा, प्रसंग गमतीजमती, विनोदी किस्से, आठवणी या शब्दबद्ध होत राहिल्यामुळे काव्यसंग्रह काढणे अधिक सोपे झाले. ज्येष्ठ मालवणी नाटककार गंगाराम गवाणकर यांचा मी ऋणी आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी माझ्या काव्यसंग्रहातील सर्व कविता वाचून दिलखुलास दाद दिली. माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. तसेच कवी नामदेव गवळी आर.डी. बोडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे निवेदन प्रा. संजीवनी पाटील तर आभार साबळे सर यांनी मानले.