*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या ज्येष्ठ सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा मावळत्या वर्षाला निरोप देणारा अप्रतिम लेख*
रवि मित्र नारायण दिनकर वासरमणी … हे सूर्यनारायणा,
किती विविध नावांनी आराधना करतो तुझी आम्ही …
हो , तुझी नित्य पुजा करावी असाच आहेस तू …!
देवा नारायणा, गेली दोन वर्षे मात्र तुम्ही नाखुश होतात का
आमच्यावर ? अहो, तुमच्या तप्त आगीत भले भले जीवजंतू
जळून खाक होतात, मग हा असा कोणता जीव जन्माला घातला देवा की , तो तुम्हाला ही जुमानत नाही …तुमची
शक्ती तर अफाट आहे ना देवा …! हो आम्हाला माहित आहे
तुमच्या शिवाय जीवसृष्टीचे पान ही हलत नाही …म्हणून तर
साऱ्या विश्वभरातील चराचरांना जगवण्यासाठी तुमची अथक
भ्रमंती चालू असते, पायाला भिंगरी लावून तुम्ही ह्या टोकापासून त्या टोका पर्यंत सतत विश्वभर फिरत
असता.. हो , तुमच्या शिवाय जगणे केवळ अशक्य आहे हे
येथील साऱ्याच जीवजंतुंना चांगलेच माहित आहे.
मग , देवा एवढे पावसाळे आम्ही पाहिले पण देवा .. असा
कहर कधी पाहिला नव्हता . दरवर्षी पूर अवर्षण अवकाळी
अशी संकटे येतात , ती ही जीवघेणी असली तरी निसर्गा पुढे
कुणाचे चालते अशी मनाची समजूत घालत ती आम्ही सोसतो,
नि पुढच्या आशेवर मार्गक्रमणा चालू ठेवतो .पण…
देवा, ह्या दोन वर्षात फारच आक्रित घडले हो ..त्या जीवाणूने
अशी काही दहशत निर्माण केली की दोन वर्षानंतरही आम्ही
पुरते सावरलो नाही हो ..! काय काय पाहिले देवा ह्या दोन वर्षात …
ते तुम्हाला माहित नाही असे थोडीच आहे.. ? तरी सांगते देवा,
किती तरी घरे उजाड झाली हो.. कुठे घरातला कर्ता पुरूष
आठवडा भरात दृष्टीआड झाला.. दवाखान्यात गेल्यावर घरच्यांना त्याचे दर्शन तर सोडाच , नख ही दिसले नाही हो..
निळ्या, पांढऱ्या कपड्यात त्याच्या अनमोल शरीराचं गाठोडं
तिसऱ्याच माणसांनी असं काही (भीतभीत) जाळलं की त्याची
राख नि हाडं ही गंगार्पण करण्यास लोकांना मिळाली नाहीत.
हे असं कसं जीवघेणं मरण देवा , माणसाला जीवंतपणी
मारणारं, अश्रू गोठवणारं …
कित्येक घरातून तर आई बाप दोन्ही गेलेत .. आता तुम्हीच
सांगा आई बापा इतकं प्रेम कुणी करतं का? मग त्यांनी कसं
जगावं आई बापां शिवाय ? देवा , ह्या कठोर जगात आई बाप
असतांनाही किती झगडा द्यावा लागतो मग ह्या अश्राप जीवांनी
कसं जगावं देवा ..?
खूप खूप पडझड झाली देवा.. तरणीताठी कमावती घरातली
पोरं सरणावर जातांना पाहून जीवाचं पाणी पाणी होत असतांना त्यांच दर्शनही मिळू नये.. त्यांच्या जवळ जायलाही
प्रत्येकाला भीती वाटावी हा कोणता दैवदुर्विलास आहे देवा ?
आतातर.. नव्याने बागुलबुवा उभा झाला आहे नि आहे ते संकट
दुपटीने वाढलं आहे.. जरा कुठे मोकळा श्वास घेऊ म्हणत होतो तर .. पुन्हा ये रे माझ्या मागल्या …! किती परीक्षा पाहणार आहात आमची अजून ? जीव मेटाकुटीला आला हो
आता.. काढा ना तुमचं ते तप्त अस्र नि जाळा ना त्याला एकदाचा देवा ….
आदित्यनाथा … शेवटच्या दिवशी विनंती करतो तुम्हाला …
आता पुरे .. आता एक तारखेला याल ते पूर्ण नवे रूप घेऊन
या .. म्हणतात ना .. “जुने जाऊ द्या मरणालागूनी….
जाळून किंवा पुरूनी टाका …”
आता विसरायचा प्रयत्न करतोय आम्ही.. तरण्याताठ्या
विधवा स्रियांनी कर्त्या पुरूषा शिवाय कसे दिवस काढायचे?
अश्रू थांबत नाही देवा ….! म्हणून म्हणते , आवरा तुमचे ते किडे मकोडे नि सुखाचा बिना मास्कचा मोकळा श्वास घेऊ
द्या आता .. ही कळकळीची विनंती … जी काही मीठ भाकर
वाट्याला येईल ती आनंदाने खाऊ आम्ही पण तुमचं हे
जीव अस्र आता आवरा … लाखोंनी जीव घेतले हो त्याने !
आता पुरे …
आनंद सुख जिव्हाळा प्रेम सौख्य कणव दया माया सहकार्य
सहानुभूती इ . सारे घेऊन या. बंधुत्व घेऊन या, त्याची जास्त
गरज आहे देवा …मोठ्या आशेने बदलाची वाट पाहतो आहोत
आम्ही .. ऐकणार ना तुम्ही आमचं एवढं …
तुमच्याजवळ मन मोकळं करावंसं वाटलं म्हणून बोलले देवा…
या .. या .. तुमच्यासाठी जीवाच्या पायघड्या घातल्यात आम्ही.. गुलाब पाकळ्यांवरून हळूवार पावलांनी या …
धुक्याचा मंडप अलगद दूर सारून रंगांचा गुलाल उधळीत,
पक्ष्यांच्या सुमधुर निनादात तुमच्या रथाचे घोडे आवरत या ..
एक तारखेला आमच्या सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या
असतील एवढे लक्षात असू द्या …
“स्वागत बावीसा तुझे .. उतरव आता मनावरील ओझे …”
तुझीच .. भारतातील लेकरे ….
“ आदित्याय नम:”
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २४ डिसेंबर २०२१
वेळ : संध्या . ५: ०५