जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक, कवी, पत्रकार सागर बाणदार यांची अप्रतिम काव्यरचना
साधी दु:खाची झळही बसू नये
इतकी तुझ्या प्रेमाची अगाध ताकद ,
पण ,आताशा तुझ्या डोळ्यातील पाणी
माझ्या मनाला करतं पुरतं गारद !
आई ,तुझं ममत्व म्हणजे
जणू साक्षात देवत्वाचं प्रकटणं ,
असं सारं सुखाचा लाभता
नाही उरत काही उणं !
आज असं काय घडलं ?
डोळ्यात यावं कधीचं पाणी ,
पण ,मीच होवूनी तुझी आई
पुसून टाकेन वेदनांची कहाणी !
तू सारं निमूट सोसावं
आता हे नाही चालायचं ,
तुझीच शिकवण येई कामी
दु:खाशी दोन हात करायचं !
तुझ्या पाणावल्या डोळ्यांच्या कडा
कधीच लपवता नाही यायच्या ,
पण ,थकलेल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या
माझ्यावरील प्रेमाखातर हास्यानं फुलायच्या !
जगण्याच्या या होरपळणाऱ्या उन्हात
तुझ्याच प्रेमाची भरवशाची सावली ,
म्हणून ,तू आहेस माझ्यासाठी
देवत्व लाभलेली थोर माऊली !
– सागर बाणदार
मो.८८५५९१५४४०