जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री श्रीम.राधिका भांडारकर यांनी ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या काव्याचे केलेले रसग्रहण
इतके उत्कट होउन आता भागत नाही
अशा वयात असे कुणी वागत नाही..
तसा दिवस समंजस ओठ मिटून घट्ट
जुनी स्वप्ने उबवीत रात्र जागत नाही…
नवी फुले पाने रोज नवे गाणे
सुगंध नि सूर काही मागत नाही….
मोहरलेली मने गगनगामी झुले
शिशिराशी वसंत नाते सांगत नाही….
एकान्ताची वेल बहरुन येते जरी
ऋतुचे पण नव्या आता स्वागत नाही
*शांता शेळके*
शांता शेळके यांची उत्कट ही कविता उतारवयातल्या
पीढी विषयी प्रातिनिधीकस्वरुपात भाष्य करते.
इतके उत्कट होउन आता भागत नाही
अशा वयात कुणी असे वागत नाही।।
मी या ओळीतल्या उत्कट याचा अर्थ अट्टाहास असा लावते..पुढच्या पीढीवर आपण आपले विचार मते लादू नयेत..आपले वय झालेआहे हेओळखून ,सर्वच बाबतीतली ऊत्कटता व्यक्त न करता संयम बाळगणे हेच
योग्य!!
तसा दिवस समंजस, ओठ मिटून घट्ट
जुनी स्वप्ने उबवीत रात्र जागत नाही।।
नवीन पीढीबरोबर जुळवून घेण्यासाठी,थांबा आणि बघा हीच भूमिका योग्य..नको लुडबुड नको सल्ले…आणि जुनं उगाळत बसून स्वत:चं स्वास्थ्य न बिघडवणं हेच चांगलं…,
नवी फुले पाने ,रोज नवे गाणे,
सुगंध नी सूर काही मागत नाही
दिसतंय् नव्या पीढीचं तांत्रीक आयुष्य..सतत नवे बदल,
नवी टेक्नाॉलाॅजी..पण त्यातले हरवलेले सूर आणि सुगंध
स्वीकारणे हेच ठीक.वयोपरत्वे ही स्वीकृती पत्करली
तर सर्वांचेच आयुष्य सुखद होउ शकेल हाच संदेश यात शांताबाई देत आहेत…
मोहरलेली मने गगनगामी झुले
शिशीराशी नाते वसंत सांगत नाही.
या ओळींमधे थोडा खेद आहे.काहीशी नकारात्मकता आहे.सळसळतं नवं रक्त ,आणि उंच भरार्या…अनेक ध्येयंअनेक स्वप्नं यामागे धावत असताना नकळत मागच्या पीढीचा हात सुटला आहे
शिशीर म्हणजे पानगळ..वृद्धत्व.
वसंत म्हणजे पालवी,नवे धुमारे ..तारुण्य..
पण वसंत शिशीराशी नाते सांगत नाही…
वृद्धांविषयीचा ममताभाव ओसरलाय्.आई वडीलांना
त्यांच्या आयुष्यात स्थान नाही…
एकांताची वेल बहरुन येते जरी
ऋतुचे पण नव्या आता स्वागत नाही..
उरलं आहे ते ते एकाकीपण…आठवणींच्या फुलांनी ते बहरतं…पण आता पुन्हा यौवनात होणे नाही…आता फक्त पैलतीर….!!
वृद्धत्वात स्वत:ला समजवणारी,स्वीकृत,काहीशी उदास
अलीप्त अशी ही शांताबाईंची अप्रतीम काव्यरचना…
उत्कट तरीही संयमी ,समंजस…
सौ.राधिका भांडारकर
पुणे