– अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील शासकीय गोदामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून ती ताब्यात घ्यावीत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पदांची निर्मिती आणि मनुष्यबळासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिले.
जिल्हा दक्षता समितीची बैठक आज घेण्यात आली. याबैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, अशासकीय सदस्य संजय माजगावकर, तहसिलदार धारवलकर, नायब तहसिलदार संजय गवस आदी उपस्थित होते.
जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. गिते यांनी विषय वाचन करून सविस्तर माहिती दिली. श्री. बर्गे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करत आलेल्या गोदामांबाबत पाठपुरावा करावा. ही गोदामे ताब्यात घेण्यापूर्वी तेथील आवश्यक त्या सुविधा पूर्ण झाल्याबाबत पहाणी करावी. काही अपूर्ण कामकाज राहीले असेल तर त्याबाबत पाठपुरावा करावा. आवश्यक असल्यास प्रस्ताव पाठवावा. दोडामार्ग तालुक्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदनिर्मिती बाबत तसेच लागणाऱ्या मनुष्यबळासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा. शिधापत्रिका धारकांना येत असणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. नव्याने प्राधान्य कुटुंबामध्ये समाविष्ट करावयाच्या शिधापत्रिका धारकांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही ते म्हणाले.
अशसाकीय सदस्य श्री. माजगावकर यांनी यावेळी विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.