You are currently viewing जिल्हा बँक निवडणूक; आज निवडणुकीचे साहित्य केंद्रावर पाठविण्यास सुरुवात

जिल्हा बँक निवडणूक; आज निवडणुकीचे साहित्य केंद्रावर पाठविण्यास सुरुवात

९८१ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ३० डिसेंबर रोजी होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दि. २९ डिसेंबर रोजी प्रत्येक केंद्राध्यक्ष यांच्या ताब्यात निवडणुकीचे साहित्य देऊन त्यांना प्रत्येक केंद्रावर पाठविण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी ९८१ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार असून सर्वाधिक कुडाळ तालुक्यांमध्ये २१३ मतदार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अटीतटीची झाली आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुद्धा खबरदारी घेतली आहे.  गुरुवार ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रावर निवडणूक संदर्भातील साहित्य तसेच कर्मचारी यांना उद्या बुधवार २९ डिसेंबर रोजी ओरोस येथील माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढीमध्ये साहित्य वाटप करून त्यांना प्रत्येक केंद्रावर पाठवले जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालय येथे हे मतदान केंद्र असणार असून केंद्राध्यक्षसह सात कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

या निवडणुकीमध्ये १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत तर ९८१ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे

तालुकानिहाय मतदार देवगड ८३, दोडामार्ग ४८, कणकवली १६५, कुडाळ २१३, मालवण ११०, सावंतवाडी २१२, वैभववाडी ५४, वेंगुर्ले ९६ असे मिळून ९८१ मतदार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी माध्यमिक शिक्षक पतपेढी मध्ये शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.

या निवडणुकीसाठी १९ जागा असून यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असणार आहेत यामध्ये महिला प्रतिनिधी मतदार संघासाठी (गुलाबी), अनुसूचित जाती, जमातीसाठी (आकाशी), इतर मागासवर्ग मतदारसंघासाठी (फिकट हिरवा), विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी (भडक पिवळा), संलग्न नागरी सहकारी मतदारसंघासाठी (फिकट पिवळा), पणन संस्था मतदार संघासाठी (फिकट पोपटी), संलग्न औद्योगिक संस्थेसाठी (जांभळा), संलग्न मच्छीमार संस्थेसाठी (पिवळा), संलग्न विणकर संस्थेसाठी (हिरवा), इतर कायद्याखालील संस्थेसाठी (फिकट आकाशी), विकास संस्था प्रत्येक तालुका मतदारसंघासाठी (पांढरा) असे रंग असणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा