You are currently viewing नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय

आज झाली अर्धवट सुनावणी:उद्या सरकारी वकील मांडणार बाजू

ओरोस

पूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसैनिक हल्ला प्रकरणी आ नितेश राणे अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज अर्धवट राहिली. संशयित वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सरकारी वकील बाजू मांडत असताना न्यायालयीन कामकाज वेळ संपल्याने त्यांची बाजू थांबवत न्यायालयाने याबाबतची कार्यवाही बुधवारी दुपारी होईल, असे जाहीर केले. त्यामुळे आ नितेश राणे, संदेश सावंत यांना अटकपूर्व जामीन मिळणार की नाही ? उद्या (बुधवारी) स्पष्ट होणार आहे.

१८ डिसेंबर रोजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. हा हल्ला आ नितेश राणे, संदेश सावंत यांनी केल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला होता. या प्रकरणी आतापर्यंत एकूण सहा संशयित अटक करण्यात आले आहेत. यामध्ये स्वाभिमानचे पुणे येथील कार्यकर्ते सचिन सातपुते यांना अटक केल्यानंतर पोलिसांची चक्रे आ राणे व संदेश सावंत यांच्या दिशेने फिरली होती. त्यामुळे या दोघांनी २७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.

सरकारी पक्षाच्यावतीने वकील प्रदीप घरत, भूषण साळवी, गजानन तोडकर हे उपस्थित होते. तर आ नितेश राणे, संदेश सावंत यांच्यावतीने वकील संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे, उमेश सावंत यांच्यासह सहा वकिलांची फौज न्यायालयात होती.

न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यावर प्रथम न्यायाधीश यांनी सरकारी वकील यांना आपण अटकपूर्व जामीन अर्जावर समाधानी आहात का ? असे विचारले. त्यानंतर न्यायाधीश व वकील यांनी पोलिसांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली. यानंतर न्यायालयाने हल्ला झालेले संतोष परब यांचे वकीलपत्र वाचले. त्यानंतर आ राणे यांच्या बाजूने वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद सुरू केला. त्यांचा युक्तिवाद सुमारे पावणे दोन तास चालला. त्यानंतर संदेश सावंत यांच्याबाजूने वकील राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद सुरू केला. त्यांचा युक्तिवाद संपल्या नंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी न्यायाधीश हांडे यांनी सरकारी वकिलांना बाजू मांडण्यास किती वेळ लागेल ? असा प्रश्न केला असता त्यांनी एक तास लागेल, असे सांगितले. त्यामुळे न्यायाधीश हांडे यांनी ही सुनावणी आता थांबविण्यात येत असून उर्वरित सुनावणी उद्या घेण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे ही सुनावणी उद्यावर गेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 4 =