सावंतवाडी
येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ. विशाल पाटील यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना कोल्हापूर येथील इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटरचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. दरम्यान रविवारी झालेल्या वितरण सोहळ्यात सुप्रसिद्ध सिने अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर येथील दसरा चौक येथील राजश्री शाहू स्मारक सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला डॉ विशाल पाटील यांचे आईवडील विजयकुमार पाटील व सौ पदमिनी पाटील, रायगडचे उद्योजक प्रकाश गायकवाड, पुण्याच्या ऑलिव्ह ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक संचालक निसार सुतार, रत्नागिरीचे प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक अशोक आखाडे, सांगलीचे पंचगव्य तज्ञ विवेकानंद जितकर, नाशिकचे समाजसेवक प्रवीण अलई, इमेज इंटरनॅशनल ऑनलाइन रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ बी एम खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
नेत्ररोग तज्ञ डॉ विशाल पाटील यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्र तपासणी शिबीरांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा त्यांनी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उपयोग करून महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची महाराष्ट्र गौरव प्रतिमा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.