You are currently viewing नाणोस भर वस्तीत फिरणार्‍या  बिबट्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलन…वासुदेव जोशी

नाणोस भर वस्तीत फिरणार्‍या  बिबट्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलन…वासुदेव जोशी

सावंतवाडी उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांना निवेदन…

सावंतवाडी

नाणोस पंचक्रोशीत तब्बल तीन बिबट्यांचा संचार आहे. ते भरवस्तीत येत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे त्यांना पिंजरे लावून जेरबंद करा,अशी मागणी नाणोस सरपंच वासुदेव जोशी यांनी उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांच्याकडे केली आहे. दरम्यान वनविभागाच्या माध्यमातून बिबट्याला जेरबंद करण्याकरिता पिंजरा न लावल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.याबाबत त्यांनी श्री नारनवर यांना निवेदन दिले आहे.

यात असे म्हटले आहे की, गेले अनेक वर्षे पंचक्रोशित बिबटयांचा जंगलात वावर असल्याने त्याने पाळीव जनावरावर अनेक वेळा हल्ले करून जखमी केलेले आहे. तसेच जनावरांना मारलेलेही आहेत. त्याबाबत ही बाब वनविभागाच्या वेळोवेळी निर्दशना आणून दिलेली आहे. परंतु त्यावर अद्यापही कोणतीही प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना दिसून आलेली नाही. आतापर्यंत बिबट्याचा वावर हा शक्यतो रानातच होता, तोपर्यंत गावात बिबिट्याच्या बद्दल तेवढे भितीचे वातावरण नव्हते. परंतु ऑगस्ट २०२१ या महिन्यापासुन बिबटे भक्षाच्या शोधात भर लोकवस्तीत येऊन घराकडील अंगणातील कुत्र्यांवर हल्ले करीत आहेत. असे हल्ले गावातील अनेक वाडीवस्त्यांवर झालेले आहेत. सध्या बिबट्याचा वावर हा संध्याकाळचा अंधार झाल्यावर लोकवस्तीच्या आजुबाजूला होताना लोकांच्या दृष्टीस पडत आहे. त्यामुळे शेतात वावरणारे शेतकरी, नोकरी, व्यवसाय, मोलमजुरी व अन्य कामानिमित्त ये-जा करणारे प्रवासी, शाळा कॉलेजला जाणारी मुले आदी ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गावात पुर्ण रत्यावर रात्रीची स्ट्रिट लाईटचा उजेड व घराकडील लाईटचा उजेड असतानाही बिबट्या भक्षाच्या शोधात भर लोकवस्तीत मोकाट फिरताना दिसत आहेत. त्यामुळे बिबट्या भक्षाच्या शोधात माणसावरही हल्ले करण्याची दाट शक्यता आहे. रात्रीच्या वेळी अवेळी बिबट्याचा ओरडण्याचा आवाज अनेक वेळा लोकांनी ऐकलेला आहे. तसेच बिबट्यांचे अनेक वेळा रस्त्यावर रात्रीच्या प्रवासा दरम्यान लोकांच्या दृष्टिस पडत आहेत. त्यामुळे गावातील लोक भयभीत झालेले आहे. बिबट्यांची संख्याही जास्त असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास येत आहे. हि संख्या अशीच वाढत राहिल्यास भविष्यात नागरीकांना घराबाहेर पडणे धोकादायक होणार आहे. त्यामुळे त्यांचा तात्काळ बंदोबस्त करा,अशी मागणी त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा