अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याची गरज; परशुराम उपरकर
सिंधुदुर्गनगरी :
पर्यावरण प्रदूषण आणि अवैध उत्खननाला गेली ३ वर्ष प्रोत्साहन देणारे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची काल जिल्ह्यातून बदली झाली. मनसेने अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या बदलीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे नवीन येणार्या अप्पर जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकार्यांनी या अवैध धंद्यांना निर्बंध लावण्याची गरज आहे, असे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
मंगेश जोशी यांनी आर्थिक तडजोड करून जमिनीचे निवाडे केले होते. त्यामुळे जनतेला उच्च न्यायालयातही दाद मागायला जावे लागले होते. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी अवैध उत्खननाचे डंपर पकडले गेल्यावरही त्यांची सुटकादेखील केली होती. कासार्डे भागातील सिलिका मायनिंग होऊन कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडला आहे. याविषयी मनसेने पाठपुरावा केला होता. २४ तारीखला मोर्चा काढला होता. परंतु तेव्हा दिलेल्या आश्वासनांची पूर्तता संबंधित विभागाने न केल्यामुळे मनसे परत आंदोलन करणार आहे.
अप्पर जिल्हाधिकार्यांविषयी जनतेच्या मनात प्रचंड द्वेष आणि राग होता. चोरट्या वाळूच्या तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती. आता त्यांची बदली झाल्यामुळे या सर्वांवर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे. नवीन अप्पर जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांनी अवैध उत्खननावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भरधाव डंपरचा, उत्खननाचा त्रास यावर विचार व्हायला हवा. नदितल्या चोरट्या वाळूवर तसेच Crz मधील वाळू उत्खननावर कारवाई व्हावी. याविषयी मनसे सातत्याने पुढाकार घेणार असून असे न झाल्यास मनसे पुन्हा आवाज उठवेल, असा इशारा देखील उपरकर यांनी दिला आहे.