You are currently viewing सावंतवाडी शहराला लागले पालिका निवडणुकीचे वेध

सावंतवाडी शहराला लागले पालिका निवडणुकीचे वेध

आम.दीपक केसरकर गड काबीज करणार की संजू परब गड राखणार?

सावंतवाडी नगरपालिका ही जिल्ह्यातील अग्रगण्य म्हणून गणली जाते. संस्थानकालीन सावंतवाडी शहराच्या नगरपालिकेवर वर्चस्व मिळविणे म्हणजे जिल्ह्याच्या हृदयावर राज्य करण्यासारखे आहे. शांत,समृद्ध सावंतवाडी शहराला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त आहे. शहर सर्व सोयींनी समृद्ध आहे, त्यामुळे शहराचा विकास करणाऱ्या कोणत्याही नेत्याला केवळ शहराचं असलेलं वैभव आणि संस्कृती टिकवून राखून ठेवली तरी विकास साधल्यासारखंच आहे.
तब्बल २३ वर्षे शहरावर अधिपत्य राखलेल्या दीपक केसरकर यांनी शहराचा कायापालट केला, परंतु त्यांच्या नंतर नगराध्यक्षपदी आलेल्या त्यांच्या सहकार्यांना विकासाचा वेग राखता आला नाही, परिणामी शहरातील केसरकर यांची सत्ता गेली आणि भाजपाचे नवे पर्व सुरू झाले. परंतु शहर विकासासाठी दीपक केसरकर यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कालखंडात केलेला विकास शहरवासीय विसरले नाहीत. मध्यंतरी केसरकर यांच्या हातून निसटून गेलेली सत्ता पुन्हा एकदा मिळविण्यासाठी केसरकरांनी शड्डू ठोकला आहे. सावंतवाडीत पुन्हा एकदा शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवायचा याच इराद्याने केसरकर यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून सावंतवाडीची जनता त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे आहे. केसरकर यांनी सावंतवाडीत सत्ता परत आणण्याचा चंग बांधल्याने केसरकर हाच आजमितीला तरी शिवसेनेचा चेहरा म्हणून समोर येत आहे.
दीपक केसरकर यांच्या पक्ष त्यागानंतर पिछाडीवर पडलेला राष्ट्रवादी पक्ष राज्यातील सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सावंतवाडीत पुंडलिक दळवींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुसंडी घेत आहे. राष्ट्रवादीकडे पुंडलिक दळवी हे देखील नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असतील परंतु माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे राष्ट्रवादीचा मुख्य चेहरा असेल. बबन साळगावकर हे केसरकरांचे पाठीराखे, परंतु मागील विधानसभेच्या निवडणुकीत केसरकरांविरुद्ध दंड थोपटून विरोधी निवडणूक लढविली परंतु अपयश पदरात पाडून घेतलं. पुणे येथून राष्ट्रवादी सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख म्हणून आलेल्या अर्चना घारे यांच्याकडे देखील राष्ट्रवादीचा एक आधारस्तंभ म्हणून पाहिले जात आहे.
काँग्रेस पक्षाचे सावंतवाडीतील अस्तित्व अबाधित राखले आहे ते ऍड दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर यांनी. नव्या दमाचे महेंद्र सांगेलकर काँग्रेसचा गड शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु शहराचा विचार करता नगरपालिकेच्या निवडणुकीत दिलीप नार्वेकर हेच मुख्य चेहरा म्हणून समोर येत आहेत.
दीपक केसरकर यांनी आपल्या विरोधात उभे राहिलेल्या भल्याभल्याना आस्मान दाखवले, परंतु मागील पोटनिवडणुकीत संजू परब यांनी केसरकरांच्या उमेदवाराचा पराभव करून केसरकरांना शिकस्त दिली होती. तेच तेच चेहरे आणि खुंटलेला विकास हा विचार करून सावंतवाडी वासीयांनी नव्या दमाच्या संजू परब यांच्यावर विश्वास दाखवला आणि केसरकर यांच्या हाती २३ वर्षेअसलेली सत्ता भाजपच्या हातात दिली होती. गेल्या दोन वर्षात सावंतवाडीत म्हणावा तसा विकास झाला नाही, परंतु सावंतवाडीकरांना स्वप्नांच्या दुनियेची सैर करवून आणली गेली. त्यामुळे येत्या निवडणुकीत सावंतवाडी वासीय कोणाच्या मागे राहतात हे पहावे लागेल. भाजपाचा सावंतवाडीतील आघाडीचा चेहरा म्हणजे संजू परब हेच होय. त्यांच्या बरोबरच अजय गोंदावळे, बंटी पुरोहित ही नावे देखील चर्चेत आहेत. त्यामुळे सावंतवाडी भाजपाचा चेहरा म्हणून मूळ भाजपवासी कोणीही समोर येत नसून संजू परब, अजय गोंदावळे, आणि बंटी पुरोहित हेच समोर येत आहेत.
एकंदरीत सावंतवाडीतील नगरपालिका निवडणूक ही येत्या काळात गाजण्याचीच चिन्हे दिसत असून पालिकेचा गड दीपक केसरकर पुन्हा काबीज करतात की संजू परब गड राखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार हे मात्र नक्की…

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =