You are currently viewing वैभववाडी येथे 25 डिसेंबर रोजी स्त्रीमुक्ती व मनुस्मृती दहन दिन होणार साजरा

वैभववाडी येथे 25 डिसेंबर रोजी स्त्रीमुक्ती व मनुस्मृती दहन दिन होणार साजरा

वैभववाडी

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ, वैभववाडी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 25 डिसेंबर रोजी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मनुस्मृती दहन दिन व स्त्रीमुक्ती दिनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात अंनिसच्या प्रमुख संघटक, सामाजिक व अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रा. पूनम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद रंगणार आहे.

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघातर्फे दरवर्षी स्त्रीमुक्ती दिनाचे आयोजन केले जाते. 2022 च्या सप्टेंबरला, संस्थेला 25 वर्ष पूर्ण होणार असून संस्थेकडून रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. यावर्षी धर्मांतराचे हीरक महोत्सव वर्ष म्हणूनही साजरे केले जात आहे.

स्त्रीमुक्ती दिनाचे औचित्य साधून यावेळी विविध कार्यक्रमाचे नियोजन केले असून अंनिसच्या प्रमुख मुक्ता दाभोळकर या ‘भारतीय स्त्रियां व अंधश्रद्धा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. शिवाय संस्थेतर्फे ‘स्त्रीमुक्ती: एक पाऊल पुढे; दोन पावलं मागे’ अशा अनोख्या परिसंवादाचे नियोजन केले असून प्रा. पूनम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद रंगणार अाहे. यामध्ये प्रा. सीमा हडकर व माधुरी तांबे आपली मते मांडणार आहेत.

उदघाटनीय सत्रात सोनाळी येथील मा. वसंत भोसले यांच्या नावीन्यपूर्ण कलाकृतींचे व स्त्रियांच्या विविध कलागुणांचे प्रदर्शन व त्याचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन केले जाणार आहे. उदघाटनीय सत्रात संस्थेचे अध्यक्ष मा. यशवंत यादव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्या व माजी सभापती व महिला मंडळाच्या अध्यक्षा शारद‍ा कांबळे, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे व महिला कार्याध्यक्षा मोहिनी कांबळे मार्गदर्शक करणार आहेत.

तर समारोप सत्रात संस्थेचे, ग्रामीण शाखेचे अध्यक्ष मा. भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक व संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील हेतकर, संस्थेचे सरचिटणीस डाॅ. देवेंद्र जाधव, महिला सरचिटणीस रुचिता कदम मार्गदर्शन करणार आहेत.
तरी मनुस्मृती दहन दिन व स्त्रीमुक्ती दिनाच्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई शाखेचे सरचिटणीस प्रा. डॉ. देवेंद्र जाधव, ग्रामीण शाखेचे सरचिटणीस रविंद्र पवार, माता रमाई महिला मंडळाच्या सरचिटणीस रुचिता कदम यांनी केले आहे.

WhatsAppFacebookTwitterGmailShare

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 12 =