You are currently viewing दि.२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन सर्वत्र साजरा व्हावा.

दि.२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन सर्वत्र साजरा व्हावा.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

वैभववाडी

दिनांक २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. २४ डिसेंबर, १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास झाला, तेव्हापासून संपूर्ण भारतभर शासकीय पातळीवर, ग्राहक चळवळ संबंधित संस्था, संघटना यांच्यामार्फत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन शासकीय पातळी बरोबरच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा केला जावा, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. मागील दहा वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व तालुक्यांमध्ये विस्तारलेली ही चळवळ निरलस, निरपेक्ष व समाजशरण वृत्तीने कार्यरत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून धरली आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहकांच्या अडचणीवर मार्गदर्शन आणि प्रशासनाला सहकार्य करीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्यकर्ते विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यरत आहेत. संवाद समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था कार्य करीत आहे.
दि.२४ डिसेंबर हा “राष्ट्रीय ग्राहक दिन” आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये साजरा केला जातो. काही तहसिल कार्यालयामध्ये आपल्या सोईने आणि औपचारिकता म्हणून साजरा केला जातो ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात यावा. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सर्वसामान्य ग्राहक राजाला जागृत करण्यासाठी शासकीय पातळीवर हा दिवस एक “राष्ट्रीय उत्सव” म्हणून साजरा झाला पाहिजे. याकामी ग्राहकाला केंद्रबिंदू मानून काम करीत असलेल्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या संस्थेचे जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या प्रशासनाला सहकार्य करीत असतात. ग्राहकांशी संबंधित विविध क्षेत्रातील मान्यंवरांना आमंत्रित करून कोरोनाचे सर्व नियम पाळून हा दिवस साजरा करण्यात यावा, जेणेकरुन ग्राहक संरक्षण कायद्याचा खरा उद्देश सफल होण्यास मदत होईल, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री. सीताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री. संदेश तुळसणकर यांनी मेलव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सदर मेलची प्रत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सिंधुदुर्ग, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व संस्थेचे राज्याध्यक्ष यांना पाठवली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा