जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख
कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचारात काँग्रेस पक्षाने शेवटच्या क्षणी मुसंडी मारली असून काँग्रेस पक्ष या निवडणुकीत किंगमेकर असेल व काँग्रेसचाच नगराध्यक्ष या नगरपंचायतीत आपल्याला दिसेल असे मत जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष,प्रवक्ते व दोडामार्ग तालुक्याचे निरीक्षक इर्शाद शेख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. इर्शाद शेख पुढे म्हणाले गेल्या नगरपंचायतीच्या 10 वर्षात कोणतीही दिलासादायक कामे झाली नाहीत. सत्ताधारी स्वतःच्या फायद्याची कामे केलेली असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे मतदार काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराना मोठ्या बहुमताने निवडून देण्याच्या मनस्थितीत आहेत. निवडणूकीच्या प्रचाराच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने या कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये नागरिकाना चांगल्या नागरी सुविधा देऊ, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अंतर्गत रस्ते,आरोग्यच्या सुविधा अश्या अनेक सुविधा चांगल्या पध्दतीने देण्याचे वचन आम्ही देत असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना दोडामार्गचे निरिक्षक व सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर म्हणाले आज काँग्रेसची देशाला गरज आहे हे जनतेला कळलेले आहे. भाजप सरकारने प्रचंड अबकारी कर लावल्यामुळे डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यामुळे महागाई प्रचंड वाढली आहे घरगुती गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे यामुळे सर्वानी आता नगरपंचायत निवडणूकी पासून सर्वसामान्य लोकांचा विचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराना निवडून देण्याचे ठरविल्याचे स्पष्ट दिसत आहे.
यावेळी बोलताना जिल्हा सचिव सुभाष दळवी म्हणाले संपूर्ण दोडामार्ग तालुका कायम काँग्रेस पक्षाच्या मागे राहिलेला आहे आणि आजही प्रचारात आम्हाला लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवारांची धास्ती घेऊन केंद्रीय मंत्री,पालकमंत्री,खासदार यांना नगरपंचायतीच्या निवडणूकीत प्रचाराला उतरावे लागले म्हणजेच निकाला आधीच काँग्रेसचा विजय अधोरेखित झालेला आहे.
यावेळी दोडामार्ग तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव नाईक, जिल्हा सचिव आनंद परूळेकर, शहर अध्यक्ष सुधीर गवस,बाबू गवस, शिवदास मणेरीकर, उमेदवार सचिन उगाडेकर,विष्णू रेडकर, संदिप लब्दे, प्रकाश नाईक,स्वाती गावकर,तेजा पेडणेकर उपस्थितीत होते