ग्रामस्थ आणि महसूल व पोलिस यांच्यामधील पोलीस पाटील हा महत्त्वाचा दुवा आहे. गावात पोलीस पाटील म्हणून कार्यरत असताना विविध दाखल्यांबाबत अनेक समस्या व प्रश्न उद्भभवतात. अशावेळी पोलीस पाटलांना सक्षम निर्णय घेण्यासाठी आणि त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस पाटलांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिली.
पोलीस पाटील दिनानिमित्त सावंतवाडी प्रांत विभागातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ल या तिन्ही तालुक्याच्यावतीने कोंडुरा तिठा येथील पारिजात सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पोलीस पाटलांच्या मेळाव्यात पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना प्रशांत पानवेकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, आरोस सरपंच शंकर नाईक, पोलीस पाटील संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष विलास साटेलकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मधुसूदन मेस्त्री, पारिजात सभागृहाचे मालक अमोल आरोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी पोलीस पाटलांच्या समस्यांचे निराकरण केले. तसेच गाव पातळीवरील पोलीस पाटलांच्या कामाचे कौतुक करून पोलीस पाटलांना दाखले देताना कुठलीही अडचण आल्यास प्रथम पोलीस पाटलांनी या समस्या व प्रश्नांचा अभ्यास करावा त्यानंतर आमच्याशी संपर्क साधून संबंधित विभागाशी चर्चा करून मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप नेमळेकर यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या.
यावेळीआदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्राप्त रोणापालच्या पोलीस पाटील निर्झरा परब आणि पोलीस पाटील संघटना स्थापन करण्यात महत्त्वाचे योगदान दिलेले संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा डिंगणे पोलीस पाटील यशवंत सावंत यांचा प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या मेळाव्याचे नियोजन ओटवणे पोलीस पाटील लक्ष्मण गावकर, माजगाव पोलीस पाटील विनोद जाधव, इन्सुली पोलीस पाटील कारीवडे पोलीस पाटील प्रदीप केळूसकर, चराठा पोलीस पाटील सचिन परब, आरोस पोलीस पाटील महेश आरोसकर, दांडेली पोलीस पाटील अनंत मालवणकर आदी पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मडूरा पोलीस पाटील नितीन नाईक यांनी केले तर आभार झरेबांबर पोलीस पाटील चंद्रशेखर सावंत यांनी मानले.