दोडामार्ग
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड ३१डिसेंबरपूर्वी उद्योजकांसाठी खुले करा, केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून मंजूर असलेल्या ‘राष्ट्रीय वनौषधी संस्था’ या प्रकल्पाचे कामे तात्काळ सुरु करा व या क्षेत्रात मोठ्या उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत उद्योजक गुंतवणूक परिषद घेण्यात यावी. या प्रश्नांकडे महामंडळ, शासन, लोकप्रतिनिधी व जिल्हा वासीय यांचं लक्ष वेधण्यासाठी १९ डिसेंबर रोजी येथील एमआयडीसी क्षेत्रात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्द पात्रकाद्वारे दिला आहे.
२०१३-१४ मध्ये मंजूर झालेल्या आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड अद्याप उद्योजकांसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. कोकणातील सर्व विकासाच्या प्रकल्पांना स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे जमीन संपादन होऊ शकले नाही. पण मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या आणि सुमारे पावणे सातशे एकर विस्तार असलेल्या आडाळी एमआयडीसी साठी मात्र अवघ्या वर्षभरात ८० टक्केहून अधिक जमीन महामंडळाकडे हस्तांतरित झाली. पण दुर्दैवाने गेल्या सात वर्षात अद्यापही येथील भूखंड उद्योजकांसाठी खुले झालेले नाहीत.
२ मार्च २०१९ रोजी पणजी -गोवा येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आडाळी औद्योगिक क्षेत्रासाठी खास गुंतवणूक परिषद घेतली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी भूखंडाची मागणी नोंदवली आहे. मात्र स्थानिक पातळीवर कुठलाही विरोध नसताना हा प्रकल्प रखडला जात आहे. त्यामुळे एरव्ही समन्वयाची भूमिका निभावणाऱ्या ग्रामस्थांना आता संघर्षाच्या भूमिकेत यावं लागत आहे.