सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असलेल्या जिल्हा बँक व चारही नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकतर्फी विजय होणार आहे. सामाजिक, विधायक, शैक्षणिक कार्य नसलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन आमच्या विरोधात लढत आहेत. केवळ राजकीय टीका करून विनाकारण विरोध करण्याचा कार्यक्रम या तिन्ही पक्षाचा आहे. त्यामुळे सुज्ञ मतदार पुन्हा भाजपलाच विजयी करणार, असा विश्वास केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
पडवे येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, डॉ मिलिंद कुलकर्णी, संदीप कुडतरकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे यांनी, मागील पाच वर्षात कुडाळ, वाभवे-वैभववाडी व जामसांडे-देवगड येथे भाजपची सत्ता होती. तेथे भाजपने विकासाची कामे केली आहेत. आरोग्य क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. कोरोना काळात रुग्णांना सेवा सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. याउलट राज्यात सत्तारूढ असलेल्या राजकीय पक्षांनी कोरोना काळात अपुऱ्या रुग्णसेवा दिल्या. जे रुग्ण कोरोना दगावले त्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या नगरपंचायत क्षेत्रातील १०० टक्के मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन यावेळी केंद्रीयमंत्री राणे यांनी केले.