You are currently viewing मालवण पं. स. चे माजी कृषी अधिकारी अविनाश मोरे यांचे अपघाती निधन

मालवण पं. स. चे माजी कृषी अधिकारी अविनाश मोरे यांचे अपघाती निधन

सातारा येथे मोटारसायकलचा अपघात : मालवण पं. स. सभेत श्रद्धांजली अर्पण

मालवण

सध्या सातारा जिल्हा परिषदेत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मालवण पंचायत समितीचे तत्कालीन कृषी अधिकारी अविनाश आनंदराव मोरे (वय ५७) यांचे नुकतेच सातारा येथे अपघाती निधन झाले. मनमिळाऊ स्वभावामुळे सुपरिचित असलेल्या अविनाश मोरे यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. मालवण पंचायत समितीच्या बुधवारी झालेल्या मासिक सभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अविनाश मोरे यांनी मालवण पंचायत समिती मध्ये कृषी अधिकारी पदावर प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. २००३ ते २०११ या काळात ते मालवण पंचायत समिती मध्ये कार्यरत होते. काही काळ प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम केले होते. मालवण मध्ये कार्यरत असताना प्रत्येक नागरिकाशी त्यांनी सौदारहपूर्ण संबंध ठेवले होते. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी, जनतेमध्ये ते लोकप्रिय ठरले होते. मालवण मधून सातारा येथे बदली झाल्यानंतर राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात मोरे यांनी उल्लेखनीय काम केले होते. पाटण तालुका कृषी अधिकारी, वसुंधरा प्रकल्प उपव्यवस्थापक या पदांवरही त्यांनी काम केले होते. मागील दीड वर्षापासून सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कृषी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दुचाकीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना ३० नोव्हेंबरला त्यांचे निधन झाले. मारुल हवेली (ता. पाटण) या मुळगावी मोरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा