हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमी ग्रुप कॅप्टन वरूण सिंग यांचे निधन
नवी दिल्ली
तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन झालं आहे.
झालेल्या या दुर्घटनेमध्ये अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. मात्र, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे गंभीर जखमी जखमी झाले होते. त्यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, 168 तासांची झुंज अपयशी ठरली.
भारतीय वायुसेनेने ही माहिती ट्वीट करत दिली. IAF ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘भारतीय वायुसेनेला कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, 8 डिसेंबर 2021 रोजी हेलिकॉप्टर अपघातात जखमी झालेले साहसी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे आज निधन झाले. भारतीय वायुसेना त्यांच्या कुटूंबात्या दुःखात सहभागी आहोत.”
झालेल्या दुर्घटनेत वरुण सिंह हे 80 टक्के भाजले असल्याचे सांगण्यात आले होते. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वरुण सिंह यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते.
2020 मध्ये हवाई आपत्कालीन परिस्थितीत एलसीए तेजस लढाऊ विमान वाचवल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. “ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी अभिमानाने, शौर्याने आणि अत्यंत व्यावसायिकतेने देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे.
त्यांनी देशासाठी केलेली सेवा कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो. ओम शांत. ” अशा आशयाचे ट्विट मोदी यांनी केले आहे.