– गृहमंत्री वळसे पाटील
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने तसेच जिह्यालगत गोवा राज्य असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. जिल्ह्यातील वाढत्या अमली पदार्थ वाहतूक, विक्रीला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी प्रभावी उपाययोजना करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.तसेच जिल्हा पोलीस दलाच्या सर्व अडचणी व समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच पोलीसविभागाच्या अडचणीबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीला आ. दिपक केसरकर, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय वर्मा, राज्य गुप्त वार्ता विभाग आशुतोष डुंबरे, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग राजेंद्र दाभाडे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यात टुरिझम पोलिस ठाणे निर्माण करावेत, अशी मागणी श्री केसरकर यांनी केली.
पर्यटकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन सिंधुदुर्ग, औरंगाबाद व नागपूर जिल्ह्यामध्ये टुरिझम पोलीस संकल्पना राबविण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना श्री वळसे पाटील यांनी दिले.
कुडाळ आणि बांदा येथे नवीन पोलिस स्टेशन इमारती, आंबोली व शिरोडामध्ये सब पोलिस स्टेशनची निर्मिती याबाबत सविस्तर चर्चा झाली.
सावंतवाडी संस्थान काळापासून असलेल्या जिल्हा कारागृह येथे येरवडा जेल टुरिझम प्रमाणे जेल टुरिझम सुरु करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना गृहमंत्र्यांनी यावेळी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग दऱ्याखोऱ्याचा असल्याने त्या सर्वांवार नियंत्रण करण्याच्या दृष्टीने आंबोली पोलीस स्टेशन दर्जावाढ तसेच शिरोडा पोलीस स्टेशनयेथील पोलीस आऊट पोस्ट दर्जावाढ करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्याचे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी जिह्वा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्याचे निर्देश ही श्री वळसे पाटील यांनी यावेळी संबंधितांना दिले.