You are currently viewing रानातली रानफुले . .

रानातली रानफुले . .

आदर्श शिक्षिका, नेशन बिल्डर अवॉर्ड, सावित्रीची लेक पुरस्कार प्राप्त, तथा विविध दैनिकांमधून सातत्याने लिहिणाऱ्या लेखिका, कवयित्री सौ.सुजाता पुरी यांचा अप्रतिम लेख

*मी पण ज्यांचे पक्व फळापरी*
*सहज पणाने गळले हो*
*जीवन त्यांना कळले हो*

अशी काही निर्मळ मनाची माणसे म्हणजे जणू रानातली रानफुलेच होय. ही
रानातली रानफुले कधीच कुंडीत रोपत नाहीत. तशीच मातीतली साधी माणसे कधीच शहरात रमत नाही.गावातील
ओसरीवर नाही तर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.
आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली.रंग उजळावा म्हणून कधीच हे प्रयत्न करत नाहीत.ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे. गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे आणि त्यात दडलेले अनुभवांचे कितीतरी अबोल किस्से.कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध . जोडीला अष्टगंध नाही तर बुक्का . तसेच थिजलेले यांचे नशीब . पण त्या बद्दल कधीच हे तक्रार करणार नाहीत.नांगर हाकून कमरेला आलेला बाक.तो बाक पाहून लोक काय म्हणतील याची ते कधीच काळजी करत नाहीत. सुती जुनाट धोतर अन् वर पांढरी कोपरी, नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ.फाटलेले शिवून आणि मळलेले धुवून अशी यांची सवय .डोईवर पांढरी टोपी.
पायातल्या झिजलेल्या वाहाणा . दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणार्‍या अशाच.कडक इस्त्रीचे कपडे यांच्या आयुष्याच्या घडीत कधीच नसतात. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला कडदोरा हीच काय ती संपत्ती. यांना कधीच सोनं अंगावर मिरवण्याचा मोह होत नाही.

*यांच्या डोळ्यांना यांचे दारिद्र्य हे दारिद्र्य वाटत नाही तर त्यात त्यांना समृद्धी वाटते*
हातात काठी अन ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न !शहाणपणाची श्रीमंती यांच्यात ठासून भरलेली असते.
रानातल्या बैलाच्या खांद्याला झालेले दुखणे असो वा पांडुरंगाने ताणून धरलेला पाऊस ! ह्यांची सोसायची तयारी .आताच्या पिढीतल्या शेतकर्‍यासारखे आत्महत्त्या करणारे हे नव्हेत.कोणत्याही दु:खाबद्दल पांडुरंगाची मर्जी म्हणून हे निवांत होतात. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही कि शेतात अजूनही दारे धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत.
देवळात पांडुरंगासमोर तन्मयतेने वीणा धरून उभे राहतील अन घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत . शिवारातल्या जोंधळ्याची गोड भाकरी . जोडीला कोरड्यास . संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या . लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण. चतकोर भर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. हाच यांचा पावर बूस्टर .मग पारावरच्या गप्पा.
एखादा बोलत असतो बाकीचे ऐकणार.गप्पांचे विषय अगदी साधे.माती अन नाती. ओले डोळे हळूच धोतराच्या सोग्याने कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने पुसतील. डोळ्यात पाणी का आले कधी वाच्यता करणार नाहीत.आपली मुले शहरात जाऊन रमली पण आपण किती एकाकी आहोत हे कधी ही दाखवणार नाहीत.
लाफ्टर क्लब,मॉर्निंग वॉक, रेफ्रेशमेंट योगा, ध्यानधारणा असल्या कोणत्याही सोंगाची त्यांना गरज नाही.स्वतःचे आयुष्य हेच तत्वज्ञान असल्याने कोणत्या साधू महाराज वा रिलीजीयस गुरूची तिळमात्र निकड नाही.दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर ते अलगद तरंगत असतात. दुःखाच्या भयसागरात त्यांचे डोळे ओले होतील पण ते स्वतः ओले होत नाहीत की बुडूनही जात नाहीत.
म्हणूनच ही माणसं आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके असतात. गावातल्या कुशीत आनंदाने जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडतात. ना बीपी, ना डायबेटीस, न कोलेस्टेरॉल.नैसर्गिक जीवन अन नैसर्गिक मृत्यू. सुख दु:खाच्या साध्या व्याख्या. जुजबी अपेक्षा अन माफक आवडी निवडी. कष्टाला नकार नाही अन सत्याला फाटा नाही.मायबाप हे कुलदैवत अन पांडुरंग हा देव. जत्रा हा उत्सव अन वारी हे उधाण !
घरात जितके जास्त पाहुणे येतील तो यांचा आनंदाचा क्षण.आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत अन दु:ख झाले म्हणून गुडघ्यात मुंडके खुपसून बसणार नाहीत. नांगर अन टाळ मृदंग हेच काय ते ध्येय !
खूप हेवा वाटतो अशा लोकांचा. अशी माणसे पाहिली कि डोळे नकळत भरून येतात अन काळजात कोलाहल होतो.
ही माणसं ढेकळातली असली तरी कठीण प्रसंगी ते कोरड्या ढेकळासारखे कडक असतात,आणि दुसऱ्यांच्या सुख दुःखाच्या बाबतीत मात्र तर पावसात भिजलेले ढेकुळ लोण्याहून ही मऊ होतात.अशी माणसे भेटली तर आनंदाने भेटून घ्या.परत भेटतील न भेटतील.ही अस्सल सुंगधी रानफुले अगदीच दुर्मिळ असतात. सुगंध उधळून देऊन कोमेजण्याची ताकद मिळवणारी रानफुले.
—————

*✒️ सुजाता नवनाथ पुरी*
*अहमदनगर*
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 13 =