You are currently viewing अतिरिक्‍त गुण मिळण्यासाठीचे प्रमाणपत्र जिल्ह्यातच मिळणार – संदीप पेंडूरकर 

अतिरिक्‍त गुण मिळण्यासाठीचे प्रमाणपत्र जिल्ह्यातच मिळणार – संदीप पेंडूरकर 

गायन, वादन, नृत्‍य परीक्षा उत्तीर्ण आवश्‍यक

कणकवली

शास्त्रीय संगीत गायन, वादन आणि नृत्‍य आदी कलांच्या तीन ते पाच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परिशिष्ट ‘अ’ प्रमाणपत्र आता सिंधुदुर्गातच मिळणार आहे. या प्रमाणपत्रासाठी मुंबई किंवा मिरज येथे जाण्याची आवश्‍यकता नाही अशी माहिती आदर्श संगीत विद्यालयाचे संचालक संदीप पेंडूरकर यांनी आज दिली.
श्री.पेंडुरकर म्‍हणाले, सन २०२१ – २२ मध्ये दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी जर शास्त्रीय संगीत गायन, वादन व नृत्य या विषयांच्या किमान तीन किंवा पाच परीक्षा परीक्षा उत्तीर्ण असतील तर त्‍यांना दहावी बोर्डाकडून अतिरिक्‍त दहा किंवा पंधरा गुण दिले जातात. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व मुख्याध्यापकांचे पत्र यांची पूर्तता केल्यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्याकडून परिशिष्ट ‘अ’ प्रमाणपत्र दिले जाईल. परिशिष्ट ‘अ’ प्रमाणपत्र सहित संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळांनी एसएससी बोर्डाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना हे गुण प्राप्त होणार आहेत.
यापूर्वी परिशिष्ट ‘अ’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना मुंबई किंवा मिरज येथे जावे लागत असे. यासाठी नाहक आर्थिक भुर्दंड व वेळही जात असे. विद्यार्थी व पालक यांचा हा त्रास कमी करण्यासाठी गांधर्व महाविद्यालयामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श संगीत विद्यालय, कणकवली येथे प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण या तीन परीक्षा किंवा प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण अशा सलग पाच परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये किमान एक वर्षाचा कालावधी असणे आवश्यक आहे. तिसरी किंवा पाचवी परीक्षा विद्यार्थ्याने सातवी किंवा त्या पुढील इयत्तांमध्ये देणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांचे पत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट, शाळेचे ओळखपत्र, संगीत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक इत्यादी कागदपत्रे सादर करून परिशिष्ट ‘अ’ प्रमाणपत्र मिळविता येईल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आदर्श संगीत विद्यालय, कणकवलीचे संचालक संदीप पेंडूरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा