आजपासून सलग पाच दिवस बाजारपेठ राहणार बंद…
वैभववाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस विळखा घट्ट होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून सलग पाच दिवस भुईबावडा बाजारपेठ कडकडीत बंद राहणार आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी बाजारपेठ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भुईबावडा ग्रामस्थ व व्यापारी संघटनेने गुरुवारपासून सलग चार दिवस बाजारपेठ बंद करणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार आज बंदच्या पहिल्याच दिवशी मेडिकल व गॕस वगळता बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. तसेच दि. २८ सप्टेंबर नंतर जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
जरी बाजारपेठ सुरू झाली तरी पुढील काही दिवस सर्व व्यापारी, ग्राहक, ग्रामस्थ, सलूनचालक, हॉटेल मालक, भाजी विक्रेते या सर्वांनी ‘मास्क वापरणे’ व शारीरिक अंतर पाळणे’ बंधनकारक राहील. विनाकारण बाजारात फिरणा-यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येईल. असेही संघटनेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.