जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची रविवार पासून सुरू झालेल्या दत्तजयंती उत्सवानिमित्त लिहिलेली काव्यरचना
दत्त गुरुंचे दर्शन होता मन मानस झाले
राजहंस भक्तिचा तेथे तृप्तीने डोले !।।
कितीक वदली आंस भेटिची
अंतरातल्या भाव दिठीची
स्वप्न पूर्तिचे आज पारणे मंगलमय झाले ।।
त्रिगुणात्मक ही दिव्य त्रिमूर्ती
तिन्हि लोकी अखंड कीर्ती
शंख, चक्र, अन त्रिशूळ डमरू पद्म करी उमले।।
अवतारांचि कथा आगळी
कृपा कटाक्षे जीवन उजळी
काषाय वस्त्र कटि झोळी हाती कमंडलू शोभले।।
प्रकट पादुका झाल्या भूवर
निर्गुण, आणी विमल मनोहर
स्वामी, करुणा, प्रसाद, यातच अवधूता पाहिले।।
दत्त गुरूंचे दर्शन होता मन मानस झाले
राजहंस भक्तीचा तेथे तृप्तीने डोले ।।
अरविंद