कुडाळ :
माणगाव येथील श्री दत्त मंदिरात दत्तजयंती उत्सवानिमित्त १२ ते १९ डिसेंबर या दरम्यान विविध धार्मिक तसेच अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. १२ तारखेपासून दररोज सायंकाळी पुराणवाचन, आरती, पालखी सोहळा व त्यानंतर ह. भ. प. पुरुषोत्तम बुवा पोखरणकर (पोखरण) यांचे कीर्तन होणार आहे. १७ रोजी सकाळपासून अखंड २४ तास नामस्मरण होणार आहे. १८ रोजी श्री दत्तजयंती सोहळा होणार आहे. या दिवशी सकाळी अभिषेक, महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, श्री कृष्ण प्रासादिक भजन मंडळ (नेरळ) यांचे भजन, पुराणवचन व त्यानंतर जन्मोत्सवाचे कीर्तन, सायंकाळी ६ वाजता श्री दत्तप्रभूचा जन्मसोहळा, सुंठवडा प्रसाद, आरती व पालखी सोहळा असे कार्यक्रम होणार आहेत. १९ रोजी सकाळी अभिषेक, पूजा, लघुरुद्राभिषेक, महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी पुराणवाचन, आरती, पालखीसोहळा, लळीताचे कीर्तन व त्यानंतर दशावतार नाट्यप्रयोगाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.