You are currently viewing मातीवरचा आक्रोश…

मातीवरचा आक्रोश…

मातीवरचा आक्रोश आता,
आकाशात पण नाही मावत!
बातमी केवढा आघात करते,
“आता नाहीत बिपिन रावत!”

नुसतंच शौर्य नव्हते रावत,
तिन्ही दलात समन्वय!
किती वीर रोज जातात,
तरी होत नाही सवय!

दर दिवशीच एकेक तारा,
उल्का होऊन पडत आहे!
खरंच गळ्यात हुंदका म्हणून,
एकेक घास अडत आहे!

शौर्य तिथेच घात असतो,
गांडुळं काय फिरतात कमी?
त्याना गाठू शकेन अशी,
यमालाही नसते हमी!

उंचावरती जाणंच सांगतं,
इंचा-इंचावरती धोके!
लोणी खावून जमिनीवरती,
खादीत निर्धोक,खादाड बोके!

चालती बोलती तटबंदीच ही,
भारतगड सुखरुप ठेवते!
हुतात्म्यांच्या माळेमधे,
आपल्या सर्वस्वालाच ओवते!

काळालाही हेवा वाटतो,
म्हणून दगा हवेत देतो!
साक्षात् देव आसन सोडून,
असे वीर कवेत घेतो!

असह्य नि असहाय म्हणजे,
काय याचा अनुभव क्रूर!
पापणी सोडून एकेक थेंब,
त्यांच्यासोबत चाललाय दूर!

प्रमोद जोशी.देवगड.9423513604

प्रतिक्रिया व्यक्त करा