You are currently viewing डेगवे ग्रामस्थांचे श्रध्दास्थान; श्री माऊली पंचायतन देवस्थान…

डेगवे ग्रामस्थांचे श्रध्दास्थान; श्री माऊली पंचायतन देवस्थान…

वार्षिक जत्रोत्सव,रविवार ५ डिसेंबर २०२१ रोजी…

कुलदेवता आई तू,माऊली माता तू.।

कृपेची सावली तू ,माऊली माऊली.।।

डेगवे निवासी, वाघेश्वरी बसली तू,।

भक्तांच्या हाकेला ,सदा तू धावली,।।
कृपेची सावली तू…… ।

गावागावात तुझी, मंदिरे बांधली।।,

माऊली, पंचायतन हि नावं तुज ठेवली,।

कृपेची सावली तू ..।।

भक्तजन येती दारी,नवस बोलती,।

दाही दिशात तुझी, दिग्विजयी किर्ती ती पसरली,।।

कृपेची सावली तू ….।

देव दीपावलीच्या ,दुसऱ्या दिनी,।।

मार्गशिर्षात जत्रा ,तुझी भरली,।

दिव्यांची आरास ती,मंदिरी दिपमाळ लावली,।।

कृपेची सावली तू …।

खणा, नारळाने ओटी,
तुझी भरली ।।

हात जोडोनिया तुज,पाच केळी ठेवली,।

कृपेची सावली तू …।।

नित्यदिनी आहे देवी आठव तुझी हृदयी,।

संकटकाळी धावोनी तू, आजवर पावली,।।

कृपेची सावली तू, माऊली माऊली,।

कुलदेवता आई तू, माऊली, माऊली….।।

अशी हि डेगवे गावची श्री. माऊली पंचायतन देवता मुंबई पासून ५५० कि.मि.अंतरावर,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या “डेगवे”गावात आहे. बांदा या शहरापासून हाकेच्या ३ कि.मि. अंतरावर गांव आहे.या गावात अंतरा-अंतरावर असलेल्या आंबेखणवाडी,फणसवाडी,जांभळवाडी,बाजारवाडी,मोयझरवाडीवराडकरवाडी,व मिरेखण वाडी होय. संपूर्ण डेगवे गावची अंदाजे लोकसंख्या अठराशे ते दोन हजारच्या आसपास आहे.

या डेगवे गावचे प्रमुख देवस्थान म्हणजे ” श्री.माऊली पंचायतन “देवस्थान होय.सदर मंदिर हे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे.पुर्वीच्या मुंबई गोवा रस्त्याच्या व आताच्या बांदा, दोडामार्ग, गोवा रस्त्याला लागूनच या मंदिराचे सहज दर्शन होत आहे.

श्री. माऊली मंदिर हे डेगवे गावच्याग्रामस्थांचे ,भाविकांचे,हितचिंतकांचे,माहेरवाशीणीचे आपुलकीचे ,नवसाला पावणारे श्रध्दास्थान आहे. या गावातील सर्व ग्रामस्थ व भाविक आपल्या घरातील शुभ कामाची सुरुवात या श्री.माऊली देवीला नतमस्तक होऊनच करतात.

५० वर्षापूर्वी या श्री.माऊली मंदिरा भोवती गर्द वनराई होती.सदर वनराई त्यावेळच्या ग्रामस्थांनी तोडून त्या ठिकाणचा परीसर स्वच्छ व सपाट केला आहे.त्यामुळे मंदिराभोवती प्रशस्त जागा झाली आहे.सदर मंदिराच्या परीसरात आंब्याची कलमे,पेरू,चिकू ,साग वैगरे सकस आहार योजनेच्या वेळी समान अंतरावर लावले आहेत. श्री.माऊली मंदिर भव्य दिव्य असून देवतांची गर्भगुढी,शिवाय त्या समोर बंदिस्त सभागृह,पुढे पाय-या,प्रशस्त बाहेरचे सभागृह आहे.मंदिरसमोर तुळशीवृंदावन व भव्यदिव्य दिपमाळा आहे.या दिपमाळेवर मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी व वार्षिक जत्रोत्सवा दिवशी पणत्या लावल्या जातात. मंदिर पुर्वाभिमुख असून मंदिराच्या डाव्या बाजूला घाडवंस,व म्हारीगंणाचे अशी छोटी,मोठी दक्षिणाभिमुख मंदिरे आहेत. शिवाय या मंदिराशेजारी आपले पती स्व.कृष्णा आंबेरकर व मुलगा स्व.डॉ. आशिष आंबेरकर यांच्या स्मरणार्थ भक्तासाठी श्रीमती मंगला आंबेरकर कुटुंबीयांनी “भक्त निवास” बांधून दिले आहे.

तर मंदिराच्या उजव्या बाजूस चव्हाट्याचे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. त्या मंदिरा समोर उत्तराभिमुख ३स्मृतिमंदिरे आहेत.शिवाय त्या मंदिर परीसरात अन्य स्मृतिमंदिरे, एक विहीर व तलाठी कार्यालय आहे.
श्री. माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात श्री.माऊली,ब्राह्मणी देवीच्या सुबक व आकर्षक पाषाणाच्या मुर्ती आहेत.त्या मुर्तीच्या जवळच अन्य पंचायतन देवता असलेल्या लहान,लहान मुर्त्या आहेत. या मुर्तींची व श्री.माऊली पंचायतन देवतांची नियमितपणे पुजा केली जाते.

या गावातील लोक “देसाई” आडनाव असलेले जास्त आहेत.शिवाय अन्य जाती धर्माचे लोकही आहेत.डेगवे गावातील सर्व जाती धर्माचे व गावकरी मंडळी व इतर लोक गुण्यागोविंदाने गावात नांदतात हे या गावाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. श्री.माऊलीच्या सर्व वार्षिक धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होतात.

या देवीचा वार्षिक जत्रोत्सवाचा कार्यक्रम प्रतिवर्षी “देवदिवाळी “च्या दुस-या दिवशी मार्गशिर्षकात साजरा केला जातो.या वर्षी सदर जत्रा रविवार दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी आहे.त्या दिवशी रात्री देवीची पालखी काढली जाते.गावातील ग्रामस्थ कोणत्याही शुभ कामासाठी व अडी,अडचणीच्या वेळी गावरहाटी प्रमाणे देवीचा “कौल”घेतात.या देवीची खणा,नारळाने “ओटी”भरतात.देवीला साखर,पेढे,नारळ,केळी,यांचा नवस बोलला जातो.
या मंदिराचा परिसर रमणीय रआहे.

या गावातील सर्व जाती धर्मातील लोक व गावकरी आपली देवीच्या शुभ आशिर्वादाने गावात,विविध ठिकाणी नोकरी व्यवसाय करीत आहेत.

शिवाय गावातील काही ग्रामस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रात क्षेत्रात नांवलौकीक कमावलेले आहे.या गावातील लोकांनी राष्ट्रपती पदक,जिल्हा परिषद पुरस्कार,सामाजिक ,शैक्षणिक ,राजकीय,धार्मिक,कला,क्रीडा,सहकार,क्षेत्रात तसेच लोकप्रतिनिधी म्हणून “नगर सेवक,आमदार,सभापती अशी विविध पदे भुषविली आहेत.
डेगवे ग्रामपंचायतीस आता पर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले असून डेगवे गावाला “आदर्श गांव”पुरस्कार मिळाला आहे.हे सर्व ग्रामस्थांच्या एकजूटीचे फळ आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.असा हा “दिग्विजय”अर्थात “डेगवे”गांव होय. तसेच त्या गावच्या ग्रामदेवतेच्या कृपेने गावात सुखशांती लाभली आहे..श्री माऊली मातेने गावातील सर्व ग्रामस्थ बांधवांना ,हितचिंतकांना,भाविकांना भविष्यात सुखी,समाधानी ठेवून त्या भाविकांची आशा आंकाशा पूर्ण करून निरोगी आरोग्य देऊन जनतेचे कल्याण करो अशी या समयी प्रार्थना करतो आहे.
——————
*✍️*उल्हास बाबाजी देसाई*
——————
डेगवे,ता.सावंतवाडी,जि.सिधुंदुर्ग
——————

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 13 =