You are currently viewing यापुढे आमदार सोडाच कोणत्याच निवडणुकीत वैभव नाईक जिंकणार नाहीत

यापुढे आमदार सोडाच कोणत्याच निवडणुकीत वैभव नाईक जिंकणार नाहीत

भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांचा दावा

मालवण

आमदार बनल्यानंतर विकासाची कोणतीही कामे न करणारे वैभव नाईक हे २०२४ च्या निवडणुकीत आमदार म्हणून सोडाच, त्यापुढे कोणत्याच निवडणुकीत जनतेतूनही निवडून येणार नाहीत असे प्रतिपादन भाजपचे राज्य सरचिटणीस , माजी खासदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले यावेळी राणे यांनी येत्या नगरपालिका आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पक्षाचा गुलाल उधळेल, फटाके फुटतील असा विश्वासही व्यक्त केला मालवण येथील भाजपा कार्यालयात आज मालवणातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत नगरपालिका निवडणूक आणि जिल्हा बँक संचालक पदाची निवडणूक याबाबत आढावा घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी खासदार निलेश राणे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, नगरसेवक गणेश कुशे, बाबा परब, विजय केनवडेकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी विजय केनवडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

तर सुदेश आचरेकर यांनी आम. वैभव नाईक यांच्या गेल्या सात वर्षातील कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली. यावेळी मालवण भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पदी निवड झालेल्या ललित हरी चव्हाण या युवा कार्यकर्त्याचा नियुक्ती पत्र देताना निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण तालुक्याबरोबरच जिल्ह्यातही भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी भाजप युवा कार्यकर्त्यानी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन जोमाने काम करावे ज्येष्ठानी केलेल्या कार्याचा पाठलाग करून विकास प्रक्रियेत आपली मोलाची भूमिका बजवावी, असे सांगतानाच आम. वैभव नाईक यांनी गद्दारीवर बोलू नये, वैभव नाईक हे काँग्रेसची औलाद होती, राणे काँग्रेस मध्ये गेल्यानंतर या औलादीने शिवसेनेत उडी मारली, वैभव नाईक हे मूळ शिवसैनिक नाहीत. त्यामुळे त्यांनी गद्दारीवर बोलूच नये, प्रत्येक निवडणुकीत राणेंना पक्षाची गुप्त माहिती पुरविणारे वैभव नाईकच होते असा गौफ्यस्फोटही त्यांनी केला. शेवटी गणेश कुशे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा