You are currently viewing “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अंतर्गत दशावताराच्या माध्यमातून जनजागृती…

“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अंतर्गत दशावताराच्या माध्यमातून जनजागृती…

सिंधुदुर्गनगरी 

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिम सुरू केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ही मोहिम जोरदारपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी तसेच कोरोना विषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेमार्फत दशावताराच्या माध्यमाचा वापर करण्यात येत आहे.

       जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या विषयी आज दशावतार नाटीका सादर केली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून ही मोहिम राबविण्यात येत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर हे या नाटीचेचे निर्मिती प्रमुख आहेत. तर राजेंद्र कदम यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच विठ्ठल मालंडकर, सुधीर गोसावी, नंदकुमार कांदळगावकर, राजाराम कांदळगावकर, उमेश मेस्त्री यांनी संगीत साथ दिली. आनंद कुंभार, नंदकुमार आचार्य,  मंगेश गोसावी,  वर्षा मोंडकर, कन्हैया फाले आणि राजेंद्र कदम यांनी कला सादर केली.

       यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांच्यासह जिल्हा परिषदचे कर्मचारी उपस्थित होते.

       या दशावतार नाटिकेच्या माध्यमातून कोरोना विषयी नागरिकांनी घ्यावयाची काळजी जसे सॅनिटायझर, मास्कचा वापर, समाजिक अंतर पाळणे या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमे अंतर्गत नागरिकांची थर्मल गन व ऑक्सिमीटरच्या माध्यमातून कशा प्रकारे तपासणी करण्यात येणार आणि काही लक्षणे आढळल्यास त्यांना नजिकच्या कोविड सेंटरमध्ये पाठविणे याविषयीही माहिती लोकांना देण्यात येणार आहे. ही नाटिका समाज माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 4 =