राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु
दोडामार्ग
कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आणि सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरवात केली. भाजप यावेळेला स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे येत इच्छूक उमेदवारांना आपले अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस यावेळेला शिवसेनेसोबत आहे. तथापि, नेते सुरेश दळवी यांनी संपर्क कार्यालय सुरू करुन निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसण्याच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. शिवसेना, मनसे आणि काँग्रेस आपापल्या परीने निवडणुकीची तयारी करत आहे. या वेळेला भाजप शिवसेना विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असे चित्र दिसणार नाही तर ते भाजप विरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दिसण्याची शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार त्यांना एकत्र बांधून ठेवण्यास साह्यभूत ठरेल असे वाटत असले तरी जागा वाटपावेळी त्यांच्यात कुरबुरीचे दर्शन घडण्याची भीती आहे. मागच्या वेळेला काँग्रेसने चार तर राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्या जागांवर ते दोन्ही पक्ष दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात त्यावेळी काँग्रसमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे होते आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांना शिवसेना भाजपच्या दोघासदस्यांनी मदत केली होती. काँगेस राष्ट्रवादीचे ते सर्व सदस्य भाजपवासी झाल्याने यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीला नवे चेहरे रिंगणात आणून जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.