बांदा
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांना बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेची विद्यार्थी उपस्थिती पाहून अध्यापन करण्याचा मोह आवरला नाही. येथील सातवीच्या वर्गात थेट जाऊन त्यांनी मुलांचा मराठीचा पाठ घेतला. मुलांना भविष्याचे धडे देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद देखील साधला. लोकप्रतिनिधी असूनही आपल्या खात्याशी संबंधित विभागात प्रत्यक्ष अध्यापन करण्याचा त्यांनी घेतलेला अनुभव हा इतर लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरेल.
सभापती अनिशा दळवी यांनी येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेला आज सकाळी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी सौ. दळवी यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना दळवी म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पटसंख्या असलेल्या व सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या बांदा केंद्रशाळेत येण्याचा योग आज आला. शाळेची शैक्षणिक व भौतिक प्रगती ही खरोखरच कौतुकास्पद आहे. लॉकडाऊन कालावधीत शाळेने लोकसहभागातून केलेला ७ लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव हा निश्चितच इतर शाळांसाठी मार्गदर्शक आहे. भविष्यात शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच तत्पर राहू. पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत असताना या शाळेत मुलांची उपस्थिती पाहून खूप बरे वाटल्याचे सांगितले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी सभापती सौ. दळवी या शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी करत होत्या. त्यावेळी त्यांनी अचानक सातवीच्या वर्गाला भेट दिली. यावेळी त्यांनी वर्गशिक्षिका उर्मिला मोर्ये यांच्याकडून आपण वर्गाचा ताबा घेत अध्यापन करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी मराठी विषय शिकवीत मुलांशी संवाद साधला. सभापतींच्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी देखील समर्पक उत्तरे दिली. यावेळी त्यांनी मुलांच्या बौद्धिक क्षमतेचेही कौतुक केले. तसेच ‘आपला कोकण’ या विषयावर निबंध लिहिण्यास सांगून बक्षिसे देण्याचेही यावेळी जाहीर केले.