जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक,कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची संत वेण्णाबाई किर्तन कथा व त्याच भागावरील त्यांनी लिहिलेली अप्रतिम काव्यरचना
सज्जनगडावरती , चैत्र वद्य चतुर्दशीला मठाच्या डाव्या बाजूच्या अंगणात वेणाबाईंचे कीर्तन आयोजित करण्यात आले. स्वतः समर्थ कीर्तनाला बसले होते. त्या दिवशी वेणाबाईंनी निरुपणासाठी
बंध विमोचन राम ।
माझा बंध विमोचन राम ॥
हा अभंग घेतला होता. उत्तर रंगात त्यांनी मीराबाईंचे आख्यान घेतले. पूर्वरंगाचा अभंग कीर्तन संपल्यानंतर वेण्णास्वामी आळवित होत्या…..
बंध विमोचन राम ।
माझा बंध विमोचन राम ॥
सकलही ऋषी मुनि भजती जयासी ।
एकचि तो सुखधाम ॥
भाव भक्तीच्या सुलभ साधनी ।
पुरवी सकलही काम ॥
सद्गुरु कृपया ओळखिला जो।
कौसल्येचा राम ॥
शरणही वेणा आत्मारामा ।
पावली पूर्ण विराम ॥
कीर्तन संपले. वेणाबाईंनी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि त्या तेथेच पूर्ण विराम पावल्या. ज्या ठिकाणी त्या कथेसाठी उभ्या होत्या त्याच ठिकाणी त्यांना अग्नीसंस्कार करुन त्यांचे समाधी वृंदावन उभे करण्यात आले. असे सांगतात , की या समाधी वृंदावनाजवळ चाफ्याचे झाड आले. पुढे समर्थानी देह ठेवल्यावर त्यांची स्वयंभू समाधी निर्माण झाली. ज्या वेळी या समाधी जवळ भक्तवृंद समर्थांची आरती म्हणत त्यावेळी वेण्णास्वामी वृंदावनाजवळील चाफ्याची फुले समर्थांच्या समाधीवर पडत असत. आजही समर्थ समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालताना समाधीच्या मागील बाजूस संत वेणाबाईंचे समाधी वृंदावन पहावयास मिळते.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( संदर्भ : सज्जनगडचा इतिहास, कै. सुनील चिंचोलकर )
याच कथाभागाशी निगडित माझी नुकत्याच ई बुक ( hripriya) म्हणून प्रकाशित काव्य संग्रहातील एक काव्य….
*मज माहेरी पाठवा*
समर्थ चरणी वेण्णाईचा एक असे धावा
गुरुराया मज माहेरी पाठवा
लौकिकातही घडे अलौकिक
कल्पना कुठे सर्व अकल्पित
सगुण मूर्तीचा वियोग ठाऊक तरीही कां रुसवा
गुरुराया मज माहेरी पाठवा
रामनवमीला श्रमली पाहून
अश्रू ढाळले प्रभू रामानी
त्या मूर्तीस अभिषेक अश्रूचा पाय कसा निघावा
गुरुराया मज माहेरी पाठवा
द्वैत न जेथे माया वा ममता
शब्दांच्या पलीकडील जगता
परब्रह्म निजधाम मनोमनी हा सांगतसे सांगावा
गुरुराया मज माहेरी पाठवा
प्रवृत्तिस जणू सासर मानी
निवृत्त्तिस परी माहेर वर्तली
शिष्य समाधी समर्थ हृदयी क्लेश कळे राघवा
गुरुराया मज माहेरी पाठवा
चैञ वद्य तिथी चतुर्दशीची
वेण्णाई निजधामीं जायची
प्रसाद अर्पून समर्थ चरणी करी कीर्तन सेवा
गुरुराया मज माहेरी पाठवा
योग साधला आख्यानाचा
प्रभु श्रीरामांच्या निर्वाणाचा
कोसळली चरणी वेण्णाई जणू सूर्यास्तच व्हावा
गुरुराया मज माहेरी पाठवा
समर्थ चरणी वेण्णाईचा एक असे धावा
गुरुराया मज माहेरी पाठवा
अरविंद
21/5/21