You are currently viewing बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना व हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना व हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण

कुडाळ :

 

“जवान व सैनिकांची सजगता देशाला सुरक्षित ठेवू शकते. जवानांमुळे आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. देशबांधवांच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या प्रति आपण संवेदनशील असणे गरजेचे आहे.”असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना व निरपराध नागरिकांना आदरांजली अर्पण करताना बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “देशासाठी शीर तळहातावर घेऊन लढायला आणि आत्मबलिदान करायला तयार असणारे सैनिक जोपर्यंत देशात तत्पर आहेत; तोपर्यंत आपण निर्धास्त आहोत. त्यांच्या बलिदानाची आठवण आपल्यातील देशप्रेमाचे निष्ठा अधिक प्रज्ज्वलित होण्यासाठी आवश्यक असते. त्यांच्याप्रती आपली सहानुभूती त्यांच्या कुटुंबियांना जगण्याची नवी उमेद व बळ देत असते.

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य प्रेमाचे धडे देण्यास उपयुक्त ठरेल. यातून चारित्र्यावान देशबांधव तयार होतील. या उपक्रमातून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि देशाबद्दलचे प्रेम अशा उपक्रमातून अधिकाधिक प्रज्ज्वलित करावे असे सांगत. या उपक्रमाचे व चेअरमन उमेश गाळवणकर यांचे त्यांनी कौतुक करत शाबासकी दिली. यावेळी ध्येय प्रतिष्ठानचे अमित सामंत, कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पालकर ,संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी उपस्थित होते.

सुरुवातीला बॅ.नाथ पै भवनाच्या प्रांगणात उभारलेल्या स्मृतिस्तंभा समोर राजेंद्र दाभाडे यांनी एन सी सी छात्र यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना मानवंदना देत आदरांजली अर्पण केली. यावेळी 26 /11 च्या हल्ल्यातील क्षणचित्रांची त्यांनी पाहणी केली.कारण या आॅपरेशनमध्ये (नरिमन हाऊस येथे) सन्मा. राजेंद्र दाभाडे त्या वेळी सहभागी झाले होते. त्यांनी संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छाही दिल्या. कुडाळ पत्रकार संघातर्फे मनोगत व्यक्त करताना विजय पालकर यांनी “आपल्यातील इच्छाशक्ती सर्व संकटावर मात करू शकते. या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या सारखी इच्छाशक्ती व देशनिष्ठा असेल तर आपणही त्यासारखे बलिदान करू शकतो. मग कळिकाळासही घाबरण्याची गरज नाही.

देशनिष्ठेची ऊर्जा आपणास व आपल्या देशास प्रगतीपथावर नेऊ शकते, असे सांगत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था, ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलीस स्टेशन, कुडाळ पत्रकार संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी रुचा कशाळीकर यांनी संविधानाचे वाचन केले व सर्वांना शपथ दिली.कार्यक्रमाचे विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 9 =