सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाच्या वतीने निषेध
कणकवली
सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून बोलताना कहा राजा भोज कहा गंगू तेली… असा उल्लेख केला आहे. संजू परब यांनी केलेल्या उल्लेखाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. संजू परब काम करत असलेल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली सुद्धा तेली समाजातीलच आहेत. त्यामुळे ही भावना त्यांनाही लागू पडते. त्यामुळे समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सिंधुदुर्ग तेली समाजाच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब यांचा निषेध करत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली यांनी केली.
जिल्हा सचिव चंद्रकांत तेली यांनी गंगू तेली ही व्यक्ती इतिहासात नव्हती. राजा गांगेय नरेश आणि चालुक्य तैलेय हे दोघे मिळून भोज राजाशी लढले. त्याची तुलना करताना अपभ्रांश झाला. ते गद्दार नव्हते. त्यामुळे राजकीय वक्तव्य करताना जातीचा उल्लेख करून आमच्या भावना दुखावू नयेत. खजिनदार परशुराम झगडे यांनी जर आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, संजू परब यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही तर त्याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसेल असा इशारा दिला. शैलेंद्र डीचोलकर यांनीही संजू परब यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. यावेळी आबा तेली, प्रकाश काळसेकर, विशाल नेरकर, दया हिंदळेकर, साई आंबेरकर आदी उपस्थित होते.