You are currently viewing ३० नोव्हेंबर पासून पंचायत राज समितीचा दौरा

३० नोव्हेंबर पासून पंचायत राज समितीचा दौरा

जि. प. अधिकारी, कर्मचारी यांच्या सुट्या रद्द; प्रशासनाची कागदपत्र पुर्ततेसाठी धावपळ सुरू

 

सिंधुदुर्ग :

पंचायत राज समिती चा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा डिसेंबर ऐवजी आता ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तारीख बदलाचे अधिकृत पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहे. विधानसभा सदस्य संजय रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा व विधान परिषदेतील ३२ सदस्यांच्या समावेश आहे. जिल्हा परिषद कारभाराची ऑडिट करणारी पंचायतराज ही विधिमंडळ सदस्यांची सर्वोच्च समिती आहे. यापूर्वी २००९ आणि २०१४ साली जिल्हा परिषद ची तपासणी करण्यात आली होती. आता २०२१ मध्ये पुन्हा यांचा दौरा होता. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा २०१५ – १६ व २०१६ – १७ चा लेखा परीक्षण पूनरविलोकन अहवाल आणि २०१६-१७, २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवाल याचे संदर्भातील मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकारी यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद ने राबवलेल्या विविध लोकोपयोग योजनांची तपासणी ही समिती करणार आहे.

दिवाळीपासूनच या दौऱ्याची कुणकुण सुरू झाली होती. त्यानंतर २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत दौरा निश्‍चित झाला होता. मात्र या दौऱ्याच्या तारखांमध्ये बदल झाला असून तब्बल एक महिना अगोदर ही समिती येत आहे. नियोजित तारखा बदलल्याने समितीला सादर कण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे प्रत्येकी ७ प्रतीत तयार करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेचे विरोधी गटातील सदस्य यांनी जिल्हा परिषदेचा कारभार योग्य होत नसून तो या समितीवर समोर उघड करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आमदार वैभव नाईक यांनीही जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी समिती सदस्य यांच्याकडे मांडली आहे. तर मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनीही जिल्हा परिषद कार्यपद्धतीचा पाडा या समितीसमोर ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या वेळेचा हा दौरा लक्षवेधी ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा