You are currently viewing तारतम्य ….

तारतम्य ….

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

कुठे हसावे कुठे रडावे समर्पित हो कुठे
कळले जर का तारतम्य हो क्वचितचं काटे
वळणावळणाची ही वाट हो आहे आयुष्याची
कुठे घाट तर कुठे लाट हो,कुठे खोल डोहाची ….

घाटा मध्ये रानफुले हो,थोडेसे थबकावे
लाट येता अवचित तिजवर आपण स्वारच व्हावे
गटांगळ्या त्या खाता जाईल नाकातोंडात पाणी
वळणाच्या या वाटेवरती येणारंच आणिबाणी …

सतर्कता ही जीवनातील जगण्याची हो किल्ली
रूसू नये हो दूर जरी ती आयुष्याची दिल्ली
समर्पण ते देवापुढती , जोडीदारा सवे
नक्षत्रे ना आली हाती , असती पहा ते दिवे…

मागे जावे दोन पाऊले, नसते पहा माघार
तुटून जाते अती ताणता मोडून जाते घर
नमते घेतो तोच शहाणा जीवन त्याला कळते
ना तर अळवावरचे पाणी, हातातून ते गळते ….

भूतकाळ हा गाडून टाका नका उसवू ना गाठी
काठी घेऊन सतत लागतो ना तर आपल्या पाठी
कुठे कधी अन् किती काय हे जमले जर गणित
हात जोडूनी उभी राहती सुखे पहा अ गणित …

नंदनवन हे आयुष्याचे आगर समृद्धीचे
फुलाफुलांचा आहे गालिचा अंगण नक्षत्रांचे
खरपूस आहे पहिला पाऊस आहे शुभ्र धुक्याचे
ज्ञानदेव सोबतीस असती अभंग ते ही तुक्याचे….

प्रा.सौ.सुमती पवार .नाशिक
(९७६३६०५६४२)
दि.२३/११/२०२१
वेळ : सकाळी: १०:३९

प्रतिक्रिया व्यक्त करा