ऑनलाईन रमी आणि रॉलेट गेम
सिंधुदुर्ग जिल्हा खरोखरच प्रगतीवर आहे म्हणायला हरकत नाही. जिल्ह्यात गेली काही वर्षे जनहीताचे उद्योग, व्यवसाय, कारखाने आदी बेरोजगारी हटविण्याच्या दृष्टीने राजकीय लोकांनी आणलेच नाहीत आणि भविष्यातही तशी आशा धुसरच दिसत असतानाच गेल्या लॉक डाऊन पासून जिल्ह्यात अवैध धंद्यांची वीण मात्र अतूट जोडली गेली असून तरुण, युवा, सुशिक्षित वर्ग मात्र अशा गैरधंद्यांकडे आकर्षित होताना दिसत आहे. गैरधंद्यांमध्ये कमी काळात मिळणारा बक्कळ पैसा यामुळे तरुणाई गैरधंद्यांमध्ये गुरफटत चालली आहे, मोबाईल वर मटका आदी देखील जोरदार सुरू असल्याने छुपे रुस्तम त्यात नशीब आजमावत असतात आणि अल्पवयातच आयुष्याची दिशा बदलून टाकतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाच तरुणाईला देशोधडीला लावणारा ऑनलाईन कॅसिनो गेम दाखल झाला असून नाशिक येथे या ऑनलाईन गेम ची पाळेमुळे रोवली गेली आहेत. चान्स टू विन या नावाने जोरदार जाहिरात करत सिंधुदुर्गात ऑनलाईन रमी आणि रॉलेट असे या खेळाचे प्रारूप असून या खेळात दोन मुली लॅपटॉपवर बॅलन्स अपडेट करतात. आणि ऑनलाईन पद्धतीने हा कॅसिनो गेम चालतो. त्यामुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर या खेळाकडे आकर्षित झालेला असून जिल्ह्यातील तरुणाई बरबाडीकडे वळत असल्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील जुगाराचा बादशाह आणि सोशल क्लब च्या नावावर कणकवलीत जुगाराचा अड्डा चालविणारा टिंगेल मोंतेरो, मोरजीचा नीती नसलेला केश, दात पडक्या आप्पा, जय आणि यश एकत्र घेऊन फिरणारा धुमाळे, वारकर चा बाबा, लाड पुरविणारा लाड असे सहाजण मिळून हा ऑनलाईन कॅसिनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालवीत असून जिल्ह्यात उद्योगधंडे येत नसल्यानेच जुगाराचे उद्योग नाशिक मधून आणून त्यांनी सिंधुदुर्गात सुरू केले आहेत. जिल्ह्याच्या प्रगतीला वेग देणारे उद्योग जिल्ह्यात येत नाहीत परंतु जिल्ह्यातील तरुणाई बरबाद करणारे, जिल्ह्याचे नाव अवैध धंद्यात खराब करणारे नवनवीन उद्योग जिल्ह्यात सुरू होत असल्याने जिल्ह्याचे पोलीस प्रमुख याकडे दुर्लक्ष का करतात असा प्रश्न जिल्ह्याच्या नागरिकांना पडला आहे. सिंधुदुर्गात सुरू होणार गोव्यातील कॅसिनो सारखे क्षणात लक्षाधीश क्षणात भिकारी होणारे जुगार जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वेळीच लक्ष घालून बंद करावेत अशी मागणी जिल्हावासीयांकडून होत आहे.