केंद्रीयमंत्री नारायण राणे आज दोडामार्ग तालुक्यात दौऱ्यावर आले असता भाजप पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत गटातटाच्या राजकारणाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. व्यक्ती कोणी असो पक्षाला महत्व द्या, सर्वांनी एकदिलाने काम करा, यापुढे गटातटाचे राजकारण बिलकुल खपवून घेतले जाणार नाही अशा कडक शब्दात केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे जैष्ठ नेते नारायण राणे यांनी दोडामार्ग मधील पदाधिकाऱ्यांना तंबी दिल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे.
आगामी होऊ घातलेली दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक, जिल्हा बँक व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा व या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे अगदी सतर्कता बाळगून दोडामार्ग तालुक्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागल्याने व भाजप मधीलच काही जैष्ठ मंडळीनी हे वाद पक्षहित व पक्षवाढिसाठी आगामी निवडणूकित बाधक ठरणार असल्याकडे राणे यांचे लक्ष वेधले होते. त्याच पार्श्वभूमीवर आजचा केंद्रीय मंत्री राणे यांचा दोडामार्ग दौरा झाला. या दौऱ्यापासून व आढावा बैठकीपासून मीडिया व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना अगोदरच सावधनता बाळगत चार हात लांब ठेवण्यात आले. यावरून या आढावा बैठकीत नेमकं काय झालं असणार याचं गुपित मीडिया प्रतिनिधींपासून लपून राहिलेलं नाही.
आजच्या आढावा बैठकीस आलेल्या केंद्रीय मंत्री राणे यांना सुरवातीलाच दोडामार्ग भाजपमधील दोन गट प्रकर्षाने दिसून आले असतील. कारण जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, संतोष नानचे व एकनाथ नाडकर्णी व अन्य काही पदाधिकारी यांनी राणे यांचे दोडामार्ग गांधी चौकात स्वागत केले. तर स्वतः तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती अनिशा दळवी, माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, बाळा नाईक, रंगनाथ गवस यांनी मुख्य बैठक स्थळी महाराजा हॉलच्या ठिकाणी स्वागत केलं. यामुळे दोडामार्ग मधील गट-तट आहेत हे सांगायला अन्य कुणा भविष्यकाराची आवश्यकता नव्हती.
त्यामुळे सोमवारी दोडामार्ग तालुका दौरा करत येथील भजापा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांना राणे यांनी आढावा बैठकीत चांगले फटकारले असल्याचे पुढे आले आहे. आज देशपातळीवर काम करत असताना अशा क्षुल्लक गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो ही दुर्दैवी बाब असल्याचेही राणे यांनी भावना व्यक्त केल्याचे समजते आहे. अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे आपापसातील गैरसमज दूर करा आणि उमेदवार कोणी असो, निवडणूक कोणतीही असो विजय भाजपाचाच झाला पाहिजे अशी कडक समज आणि तितकेच भावनिक आवाहन केंद्रीय मंत्री राणे यांनी दोडामार्ग मधील महत्वाच्या आढावा बैठकित त्या काही पदाधिकारी यांना केले आहे. करकर्ते यांच्यात याबाबत चांगलीच कुणकुण होती, पण आता राणे साहेबांनी लक्ष घातल्याने आपले पदाधिकारी जोमाने एकत्र काम करतील असा सुरही ऐकावयास मिळाला आहे. या निमित्ताने दोडामार्ग मध्ये आलेल्या केंद्रीय मंत्री राणे यांचे दोडामार्गात पदाधिकारी यांनी जोरदार स्वागत केले.
या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष, तालुका निरीक्षक प्रमोद कामत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, डॉ. अनिशा दळवी, चेतन चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, रंगनाथ गवस, शैलेश दळवी, बाळा नाईक, चंद्रशेखर देसाई, संध्या प्रसादी, रेश्मा कोरगावकर, राजेश प्रसादी, पांडुरंग बोर्डेकर, विठोबा पालयेकर, देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते. एक ते दीड तास आढावा बैठक घेतल्यानंतर राणे पुन्हा सावंतवाडी कडे रवाना झाले. मात्र गांधी चौकात थांबलेल्या पत्रकारांना त्यांनी आवर्जून हात दाखवला.