अजित नाडकर्णी यांनी केलं संवर्धन आणि सुशोभीकरण
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील हवेलीनगर, पहिली माळवाडी येथे सुमारे २०० वर्षे जुनाट आम्रवृक्ष आजही ताठ उभा असून वाटेने जाणाऱ्या वाटसरूंना विश्रांतीसाठी छाया देत असून लोकांचे मार्ग निवारा स्थान म्हणूनच प्रचलित आहे. दोन शतके अखंड ऊन पावसात उभा असलेला हा वृक्ष जुनाट झाल्याने वृक्षाच्या लगतच्या प्रॉपर्टी चे मालक अजित नाडकर्णी यांनी वृक्ष आणि आजूबाजूच्या परिसराचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे ठरविले. आम्रवृक्षाला चिर्यांचा मजबूत पार बांधून त्याला भक्कम आधार द्यायचा विचार केला आणि त्यांनी तो प्रत्यक्षात अंमलात देखील आणला.
अनेक वर्षे साथ देत असलेल्या आम्रवृक्षाला पार बांधून परिसरात पेव्हर ब्लॉक्स बसवून नाडकर्णी यांनी मार्ग निवारा हे एक प्रेक्षणीय स्थळ निर्माण केले. नाडकर्णी यांच्या वृक्ष संवर्धनाच्या कल्पनेमुळे त्यांच्या मनास संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवला तो म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…..
वृक्षाच्या मागील बाजूस नाडकर्णी यांच्या प्रॉपर्टी मध्ये अजित नाडकर्णी यांच्या पणजोबांचे बसण्याचे सिमेंट चे बाकडे होते, ते देखील सुव्यस्थित करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रत्येक माणसाने अजित नाडकर्णी यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. त्यामुळे त्यांनाही भरून पावल्या सारखी अनुभूती येत आहे. सदरची सर्व माहिती ८७ वर्षे वयाचे असलेले माजी सरपंच श्री चंद्रकांत पारकर यांनी दिली.
एकीकडे वृक्षांची तोड होत सिमेंटची जंगले उभी राहत आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, तर दुसरीकडे अजित नाडकर्णी सारख्या व्यक्ती स्वतःच्या कमाईने २०० वर्षे जुनाट असलेला महाकाय आम्रवृक्ष संवर्धन आणि सुशोभीकरण करून त्याची जपणूक व जतन करत आहेत. वृक्षांचे जातं करणे जपणूक करणे ही काळाची गरज असून पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे वातावरणात कमी झालेला प्राणवायू हे वृक्ष तोडीचेच परिणाम असल्याचे कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करायला हवा, तरच येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्वल आहे, अन्यथा अनंत अडचणींचा सामना करण्याची वेळ भविष्यात आल्या वाचून राहणार नाही.