You are currently viewing राज्यातील “पियुसी” च्या दरात दोन ते तीन पटीने होणार वाढ…

राज्यातील “पियुसी” च्या दरात दोन ते तीन पटीने होणार वाढ…

“ऑल पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशन”चा निर्णय

पुणे

राज्य शासनाने मागील दहा वर्षांपासून ‘पीयुसी’चे दर वाढविले नाहीत. ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे चालकांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत असून पीयुसी केंद्र चालविणेही कठीण होत असल्याचा दावा करत ऑल पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनने पीयुसीचे दर दोन ते तीन पटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागु केली जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात पीयुसीसाठी ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली. त्यानंतर मागील कोरोनामुळे २२ मार्चपासून पीयुसी सेंटर बंद होते.
त्याचा फटका चालकांना बसला आहे. अनेकांनी कर्ज काढून नवीन पीयुसी मशीन घेतले आहे. ऑनलाईनमुळे इंटरनेटचा खर्च वाढला आहे. पण शासनाने दरवाढ न केल्याने २०११ च्या दराप्रमाणेच पीयुसीचे वितरण केले जात आहे. सध्या बहुतेक वाहने बीएस ४ असल्याने त्यांना १ वर्षाचे पीयुसी देणे बंधनकारक आहे. यापुर्वी किमान सहा महिन्यांचे पीयुसी देण्यात येत होते. त्यामुळे आता वाहनधारक पुन्हा वर्षानेच येणार आहेत. ऑनलाईनमुळे वेळही अधिक लागत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप भंडारे यांनी सांगितले.
खर्च वाढलेला असल्याने संघटनेकडून दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनालाही कळविण्यात आले आहे. त्यांनी हे दर मान्य करणे अपेक्षित आहे. मोटार वाहन कायद्यानुसार पीयुसीचे दर ठरविण्याचे अधिकार राज्य शासनाला नाहीत. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून संघटनेकडूनच दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचा खर्चानुसार हे दर निश्चित करण्यात आले आहेत. याविरोधात शासनाने कारवाई केल्यास आम्ही राज्यातील सर्व पीयुसी केंद्र बंद ठेवू, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
पीयुसीचे सध्याचे दर व वाढणारे दर
वाहन प्रकार सध्याचे दर वाढणारे दर
दुचाकी ३५ – १००
तीनचाकी ७० – १५०
चारचाकी (पेट्रोल) ९० – २००
चारचाकी (डिझेल) ११० – ३००
सर्व अवजड वाहने ११० – ४००

प्रतिक्रिया व्यक्त करा