You are currently viewing खरंच….. आनारोजीन लोबोनी वयोमानानुसार विश्रांती घ्यावी का?

खरंच….. आनारोजीन लोबोनी वयोमानानुसार विश्रांती घ्यावी का?

संपादकीय….

सावंतवाडी शहर….सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शांत सुसंस्कृत, सुशिक्षित लोकांचे निसर्गसौंदर्याने नटलेले सुंदर शहर. सावंतवाडी कधीच राजकीय राडे अथवा राजकीय घडामोडींसाठी नावाजलेले नव्हते. अगदी समाजवादी राजवटीपासून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेने शहरावर सत्ता गाजवली. राष्ट्रवादी शिवसेनेच्या काळात माजी राज्यमंत्री विद्यमान आम. दीपक केसरकर यांनी आपल्या नगरपालिकेतील कार्यकाळात शहराचा विकास केला, आमूलाग्र बदल शहरात झाले. मुंबई गोवा(जुन्या) महामार्गावरील पर्यटकांच्या सर्वात पसंतीचे आणि आवडीचे शहर म्हणून सावंतवाडी नावारूपास आले.
सावंतवाडी शहरात राजकारणापेक्षा समाजकारणावर राजकीय लोकांचा कल असायचा. विरोधक असले तरी शहर विकासासाठी एक होऊन कार्य करायचे. टीका टिपण्णी ही बौद्धिक पातळीवर असायची वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या अनुभवावरून त्यांच्या मान राखला जायचा. राजकीय विरोधक देखील तेवढ्याच बौद्धिक पातळीवरचे असायचे. स्वच्छ चारित्र्य आणि समाजात चांगल्या कार्यामुळे नावाजलेले. पैशाने गरीब होते परंतु त्यांच्याकडे अनुभव आणि मनाची श्रीमंत असायची. गेल्या काही वर्षात सावंतवाडी शहराच्या संस्कृतीचा ऱ्हास होताना दिसत असून बाहेरील राडा संस्कृती, असंविधानिक शब्द, असंस्कृतीक कृत्ये यामुळे सावंतवाडीचे राजकारण आज ढवळून निघत आहे. राजकारणात टीका करताना देखील एक प्रोटोकॉल पाळला जातो, कोणी कोणावर बोलावे याची सीमा निश्चित असते. परंतु झाडाचे गुणधर्म पानापानात उतरतात तसे आज कोणीही उठून कोणावरही टीका करू लागले आहेत. स्वतःची राजकीय उंची न तपासता, आपण जनतेच्या दरबारात खरे उतरलो का? जनतेच्या परीक्षेत पास झालो का? याचे भान न ठेवता, आपल्याकडील पैसा किंवा आपले समर्पण पाहून एखाद्या पक्षाचे पद मिळते आणि ते पद म्हणजे जनतेचा आशीर्वाद असे गर्वाने फुगल्यावर वाटते तसे वाटून घेऊन राजकारणात ज्यांची उभी हयात गेली, चार पाच वेळा जनतेने निर्विवादपणे आपल्या सेवेत ज्यांना रुजू करून घेतले त्यांनाच असंबंधिक सल्ले देत बसतो.
राजकीय पद ही पूर्वी तपस्या असायची, तपस्येने पद मिळायचं. आज पद म्हणजे प्रसाद झाला आहे. पूजेला नेहमी येतात त्यांच्या हातावर घरातील सर्वांना पुरेल इतके प्रसादाचे द्रोण बांधून दिले जातात. तशीच आज राजकीय पदे वाटली गेली. जनतेच्या सेवेची तपस्या डिजिटल झालेल्या राजकारणात लुप्त होत गेली. त्यामुळेच राजकीय अभ्यास, राजकीय ज्ञान न घेताच राजकारण कोळून प्यालेल्या सखोल अभ्यास असणाऱ्या आणि नगराध्यक्षपद भूषविलेल्या जनतेच्या मनातील व्यक्तिमत्वावर टीकास्त्र सोडले जाते.
आजकाल पुरस्कार देखील सहज मिळू लागले आहेत, त्यासाठी नक्की कोणती योग्यता तपासतात हेच समजत नाही, त्यामुळेच आज मिळालेले पुरस्कार देखील वादातीत असतात. परंतु ते पुरस्कार म्हणजे वाट्टेल ते बोलण्याचे लायसन्स असाही पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा समज होतो याचे उत्तम उदाहरण आपण पाहत आहोतच. सौंदर्य आणि अभिनय एवढीच गोष्ट एखाद्या पुरस्कारासाठी पुरेशी नसून समाजातील योगदान आणि लोकांच्या मनातील आपली योग्यता ही बाब अत्यंत महत्वाची आहे. पुरस्कार हे मिरवण्यासाठी नसतात तर ते मिळाल्यावर आपली सामाजिक बांधिलकी वाढते. आज शिवसेनेच्या गटनेत्या असणाऱ्या आनारोजीन लोबो या एकट्या महिला शिवसेनेचे धनुष्य पेलताना दिसत असून इतर नगरसेवक चिडीचूप असतात, त्यामुळे जे खरोखर कार्य करण्यासाठी झटतात त्यांच्यावरच चिखल उडत असतो. सावंतवाडीत जिओ केबलसाठी झालेली खोदाई आणि त्याला दिलेली मान्यता ही देखील वादातीत आहे, भर दिवाळीत खोदाई करून कित्येक दिवस वाहनांचे होणारे अपघात सत्ताधारी उघड्या डोळ्याने पाहत होते, का? जिओ चे कॉन्ट्रॅक्ट घेणारे सत्ताधाऱ्यांचे निकटवर्तीय आहेत का? शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाईची परवानगी नाकारण्यात आल्याचे वाचनात येते. (सत्य तेच जाणोत) परंतु वाढलेल्या इंधनाच्या दरापुढे गॅस पाईपलाईन मुळे शहरवासीयांना कमी दरात गॅस उपलब्ध होऊन महागाईमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता वाटत असताना एका सत्ताधारी राजकीय पदाधिकाऱ्याच्या मताप्रमाणे शैक्षणिक दृष्ट्या जिओ चे इंटरनेट अतिशय महत्वाचे आहे. खरंच….? सावंतवाडी शहरात सर्व कंपन्यांच्या इंटरनेट सुविधेचा वाताहात झाली आहे का? असा प्रश्न त्या वक्तव्यानंतर उभा राहतो. पण प्रथमच म्हटल्याप्रमाणे कोणीही उठतो आणि कुठल्याही व्यक्तीवर, कोणत्याही माणसावर टीकाटिप्पणी करतो. त्यामुळे शहरवासीय आज अशा कोणावरही टीका करणाऱ्या व्यक्तींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत.
मैदानात उतरायचे असेल तर खेळ सुरू झाल्यापासून पॅड बांधून तयारी करावी लागतेच, त्यामुळे येत्या निवडणुकीत जनतेच्या दरबारातील परीक्षेला सामोरे जायचे असेल तर आधीपासूनच प्रकाशझोतात राहिले पाहिजे, शहरातील लोकांच्या नजरेत आणि चर्चेत राहण्यासाठी नक्कीच आपल्यापेक्षा अनुभव आणि वयाने, राजकीय उंचीने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीवरच टीका केली पाहिजे हे मात्र १००% खरे आहे, आणि त्याचेच दर्शन शिवसेनेच्या सावंतवाडी नगरपालिकेतीळ गटनेत्या आनारोजीन लोबो यांच्यावर होणाऱ्या टिकेमधून दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा