बांदा
विलवडे गावात जुलै महिन्यात आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या शेतकरी तसेच ग्रामस्थांना अद्यापही शासकीय मदत मिळालेली नाही. नुकसानग्रस्तांच्या खात्यात भरपाई रक्कम जमा व्हावी. तसेच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी विलवडे ग्रामस्थानी केली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना देण्यात आले. नुकसानग्रस्ताना २० नोव्हेंबर पूर्वी भरपाई न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
आॅगस्ट २०१९ आणि जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात विलवडे गावातील शेतकर्यांच्या शेती, बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. झालेले नुकसान पाहता शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई पुरेशी नाही. मात्र प्रशासकिय कार्यालयातील कर्मचार्यांच्या मनमानी तसेच सदोष कामामुळे शासनाची तुटपुंजी मदत मिळविण्यासाठी सुद्धा वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची नाराजी विनायक दळवी यांनी व्यक्त केली. यावेळी सोमवारी याबाबत संबंधितांची बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन म्हात्रे यांनी दिले.
यापूर्वी विलवडेत आलेली मदत देताना गावातील लोकांना वारंवार डावलण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शासनाने निर्धारीत केलेली रक्कम काही मोजक्याच ग्रामस्थांना मिळाली असून उर्वरित वंचित नुकसानग्रस्ताना २० नोव्हेंबर पुर्वी न मिळाल्यास तहसिलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी सखाराम सावंत, अरुण दळवी, सखाराम दळवी तसेच मळावाडी, फाैजदारवाडी, पिसुळे (वरचीवाडी) येथील पुरग्रस्थ उपस्थित होते.