खूनी जेरबंद : दागिन्यांच्या लालसेनेच केला खून
वारंवार बेपत्ता होणाऱ्या कुशल टंकसाळीची कबुली
सावंतवाडी
सावंतवाडी उभाबाजार येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला असून बेपत्ता झालेला त्या युवकानेच खून केल्याची कबूली दिली आहे. दागिने चोरण्याच्या हेतूनेच हे हत्याकांड झाले असून पोलीसांनी खुन्याला जेरबंद केले आहे. कुशल उर्फ विनायक नागेश टंकसाळी ( ३२ , रा. उभाबाजार, सावंतवाडी ) असे त्याचे नाव असून शहरातून दोन वेळा बेपत्ता झालेला हाच युवक आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी दिली. खून प्रकरणात सहभागी असल्यानेच त्याने भितीपोटी स्वतःला संपवण्याचा व पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे.
सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांच्या चौकशीच्या भीतीने बेपत्ता होत विष प्राशन केल्यानंतर पुन्हा एकदा नाट्यमय रित्या बेपत्ता झालेला सदर युवक अखेर पोलिसांना सापडून आला. ठाणे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. सावंतवाडीत आणल्यानंतर त्या युवकाची येथील पोलिस ठाण्यात कसून चौकशी केल्यानंतर अखेर त्याने खुनाची कबुली दिली. कुशल हा मृत नीलिमा खानविलकर यांचा शेजारी असून पैशांची गरज असल्याने दागिन्यांच्या हव्यासापोटी त्याने हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, सहा. पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांचे विशेष अभिनंदन केले.
सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात राहणाऱ्या नीलिमा खानविलकर व शालिनी सावंत यांचा गळ्यावर वार करून निर्घूण खून करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या खळबळजनक दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस यंत्रणा तपासकामाला लागली होती. यात सावंतवाडी पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीम पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत होत्या.
या प्रकरणात खून झालेल्या दोन्हीही कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात आली तर खून झालेल्या कालावधीत त्या परिसरात कोण कोण वावरत होते. त्या खून झालेल्या घरात कोण कोण जाऊन आले त्यांची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली होती.
तसेच त्या दोघांनाही पोचवले जाणार्या जेवणाच्या डब्याचा वेळ याची देखील पोलिसांनी माहिती मिळवली. मात्र, खून सुरुवातीपासूनच या तपासाबाबत पोलिसांकडून चांगलीच गुप्तता बाळगली जात आहे.
या पार्श्वभूमीवर खुनाच्या तपासासाठी अनेक जणांची चौकशी सुरू असतानाच चौकशीसाठी बोलावलेल्या एका युवकाने चौकशीच्या ससेमिर्याच्या भितीने बेपत्ता होत विषप्राशन केले होते. त्यावेळी त्याच्या पत्नीने दिलेल्या बेपत्ताच्या तक्रारीनंतर पोलीसांनी त्याला वेंगुर्ला येथून ताब्यात घेतले होते. मात्र, विष पिल्याने अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून डॉक्टरच्या सल्ल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते. मात्र, ९ नोव्हेंबर रोजी उशिरा तो पुन्हा नाट्यमयरित्या बेपत्ता झाला. त्यामुळे संशयाची सुई त्या युवकाकडे वळली.
दुसऱ्यांदा बेपत्ता झालेल्या त्या युवकाचे प्रथम लोकेशन हे आंबोली – पारपोली भागात आढळून आले होते. ज्या परिसरात लोकेशन आढळले त्या ठिकाणी पोलिसांनी जात तपास देखील केला. तर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचा काही सुगावा लागला नाही. त्यानंतर त्याचे मोबाईल लोकेशन मुंबई ठाणे परिसरात आढळून येताच पोलिसांनी मुंबई गाठत त्याचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेत सकाळी सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, याला पोलिसांकडून दुजोरा देण्यात आलेला नव्हता. त्या बेपत्ता युवकाला कधी व कुठे कसे ताब्यात घेतले याबाबत कोणतीही माहिती देण्यास पोलिसांकडून थेट नकार दिला जात होता. तसेच या तपासाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
याबाबत सावंतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गुन्हयाचे गांभिर्य ओळखून मा.पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अगलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार याची वेगवेगळी पथके तयार करण्याचे आदेश देवून गुन्हयाचा तपास शिघ्रगतीने करण्याचे आदेश दिले. सदर पथकांचा तपास अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व एस.डी.पी.ओ. नितीन कटेकर यांच्या देखरेखीखाली सुरु होता.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सुमारे ४० साक्षीदाराकडे चौकशी करण्यात आली. तसेच घटनास्थळ व आजुबाजुचा परिसर पोलीस पथक, डॉग स्काड, इन्हेस्टीगेशन व्हॅन यांच्या मार्फतीने पिंजून काढण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या सखोल तपासामध्ये संशयीत इसमास मानखुर्द, मुंबई येथून सावंतवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. तौसिफ सय्यद व पथकाने चौकशीकरीता ताब्यात घेवून सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले. त्याच्याकडे करण्यात आलेल्या सखोल चौकशीमध्ये त्याने मयत महिला नामे निलीमा खानविलकर यांच्या गळयामध्ये असलेल्या सोन्याच्या चेनकरीता निलीमा खानविलकर व त्यांच्या केअर टेकर शालिनी सावंत यांचा निघृण खून केल्याची कबुली दिली. पोलीसांच्या तपासामध्ये त्याने खुन करण्याकरीता वापरलेला चाकू व वितळविलेले सोने काढुन दिले.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.डी.पी.ओ. नितीन कटेकर यांच्या देखरेखीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, सायबर विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, स्था. गु. शाखाचे पो.उ.नि. सचिन शेळके, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. जयराम पाटील, स्था.गु.शाखेचे पो.ह. सुधिर सावंत, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रविण वालावलकर, आशिष गंगावणे, गुरुनाथ कोयंडे, पो.शि. प्रथमेश गावडे, अमित पालकर, जयेश सरमळकर, संदिप नार्वेकर, यशवंत आरमारकर, अमित तेली तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पो.ह. प्रसाद कदम, पोहवा मुकुंद सावंत, पोहवा सतिश कविटकर, पो.ना. अमित राउळ, पो.शि. रामचंद्र साटेलकर, निलेश सावंत, भुषण भोवर, मनिष शिंदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.