*संवाद मीडियाच्या बातमीनंतर त्या खाकी वर्दीवाल्याची झालेली बदली*
माणगाव खोऱ्यात अवैध व्यवसायाने पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. संवाद मीडियाने माणगाव येथे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर प्रकाशझोत टाकत माणगाव मध्ये खाकी वर्दीच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांची पोलखोल करत माणगाव येथे सुरू असलेले मटका आदी गैरधंदे बंद केले असे भासवून एका सोशल मीडिया चॅनेलवर आपलीच वाह वाह करून घेणाऱ्या खाकी वर्दीतील माणगाव येथील चार्ज असणाऱ्या एका अधिकाऱ्याने एका मटका व्यावसायिकाचा मटका बाजारात घेण्यास बंदी करून स्वतःचा हफ्ता वाढवून घेत दुसऱ्या मटका व्यावसायिकाला बाजारपेठेत मटक्याचा व्यवसाय करण्यास बाजारपेठ खुली करून दिली होती.
संवाद मीडियाने या खाकी वर्दीतील शिलेदाराची शिताफी जनतेसमोर आणत माणगावचा चार्ज असणाऱ्या कुडाळ येथील वरिष्ठांचे लक्ष वेधले होते. माणगाव येथील त्या बढाया मारणाऱ्या शंकराचे नाव धारण करणाऱ्या कारवारीच्या कृत्यांची दखल घेत त्याची बदली केली होती. त्यामुळे माणगावात सर्वसामान्य माणूस समाधान व्यक्त करत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून शंकर नाम धारी खाकीचा कारवारी पुन्हा एकदा माणगावात आला असून तेव्हापासून परत माणगावात मटका जोरदार सुरू झाला आहे. त्यामुळे खाकी वर्दीतील याच शिलेदाराच्या आशीर्वादाने माणगावात मटका, दारू सारखे अवैध धंदे बिनधास्तपणे चालतात यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे कर्तव्यात कुसुर न करणारे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे माणगावात बिनधास्तपणे सुरू असणाऱ्या मटका आणि दारूच्या अवैध धंद्यांची जिल्हा पोलिस प्रमुखांनी दखल घ्यावी आणि या अवैध धंद्यांना पाठबळ देऊन हफ्ते घेणाऱ्या खाकीच्या शिलेदारांवर कारवाई करावी अशी मागणी माणगाव वासीयांमध्ये जोर धरू लागली आहे.