You are currently viewing छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत  13, 14,27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिम

छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत  13, 14,27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिम

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी

मुख्य निवडणूक अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोग यांच्याकडील 20 ऑक्टोंबर 2021 रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्यामध्ये दिनांक 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळापत्रकाप्रमाणे  विशेष मोहिमांचा कालावधी उद्या शनिवार दि. 13 नोव्हेंबर, रविवार, 14 नोव्हेंबर, शनिवार दि. 27 नोव्हेंबर आणि रविवार दिनांक 28 नोव्हेंबर हा आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी आज प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

            पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहे. एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दिनांक 01 नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, दावे व हरकती निकालात काढणे 20 डिसेंबर आणि मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे 05 जानेवारी 2022 असा आहे.

            जिल्ह्यातील नागरीकांनी दि. 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये पुढीलप्रमाणे योग्य तो फॉर्म- नमुना नोंदविणेकरिता आवाहन करण्यात येत आहे. 1) फॉर्म- नमूना नं. 6 –नव्याने मतदार नोंदणी करणे.2) फॉर्म- नमूना नं. 7 मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणे. 3)फॉर्म- नूमना नं. 8  मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करण्याकरिता. 4) फॉर्म. नमूना नं. 8 अ- मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता.

            दि. 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित नव्यांने नाव नोंदणी करणेचे शिल्लक असल्यास अशा नवतरुण मतदारांना भारत निवडणूक आयोग, यांनी पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे अशा मतदारांनी तसेच इतर काही मतदार आहेत ज्यांची नावातील दुरुस्ती / कायमस्वरुपी स्थानात बदल/ मयत मतदार असे अर्ज संबंधित तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करता येतील.

            ग्राम विकास विभागाच्या दिनांक 25 ऑक्टोंबर 2021 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेश संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा