You are currently viewing सावंतवाडीची जपलेली संस्कृती इतिहास जमा होऊ नये म्हणून आम.दीपक केसरकर पुन्हा होम पिचवर

सावंतवाडीची जपलेली संस्कृती इतिहास जमा होऊ नये म्हणून आम.दीपक केसरकर पुन्हा होम पिचवर

*पत्रकार परिषदेत फुंकले रणशिंग.*

 

सावंतवाडी नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत काठावर पास होत आम.दिपकभाई केसरकर यांच्या शिवसेनेची सत्ता आली होती. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसच्या उमेदवारांनी काटे की टक्कर देत भविष्याची नांदी दिली होती. परंतु विधानसभेची निवडणूक येताच नगराध्यक्ष पदावर असलेले केसरकर यांचे कट्टर समर्थक बबन उर्फ प्रेमानंद साळगावकर यांनी आमदारकीच्या महत्वाकांक्षेपोटी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त जागेसाठी झालेल्या पालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या राणेंच्या समर्थकांनी जोरदार लढत देत नगराध्यक्ष पद खेचून घेतले आणि २३ वर्षे सावंतवाडीत असलेलं दीपक केसरकर यांचे राज्य खालसा केलं.

सावंतवाडी नगरपालिका पोटनिवडणुकीच्या नंतर सावंतवाडी शहर विकासाची आणि शहराची झालेली वाताहात पाहता आम.दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत आपण येत्या निवडणुकीत होम पिचवर पुन्हा उतरत असून निवडणुकीस सज्ज असल्याचे सांगत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. सावंतवाडी शहरात सुरू झालेले अवैद्य धंदे, जुगाराचे अड्डे, मटक्याचे स्टॉल, गांजा, चरस विक्री, खून आदींच्या पार्श्वभूमीवर बोलताना केसरकर म्हणाले चुकीच्या लोकांच्या हातात शहराची सत्ता गेली त्यामुळे शहर विकास रखडला. परंतु कमी वेळात त्यांचे खरे रूप तरी लोकांना कळाले. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळणार, असे सांगत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. गेल्या नगरपरिषद निवडणुकीत दोन जागांवर उमेदवारी देताना निर्णय चुकला, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. मागील निवडणुकीत साथ सोडून विरोधी भूमिका घेतलेल्या माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या बाबत बोलताना साळगावकर हे प्रामाणिक आहेत, त्यांची मानसिकता असेल तर ते माझ्या सोबत पुन्हा काम करू शकतात असे सांगितले. दारू, मटका, जुगार या व्यवसायातून पैसा मिळविणारे लोक जर निवडणूक रिंगणात येत असतील तर त्यांना शहराची संस्कृती जपण्यासाठी रोखायला हवे. यासाठी शहरातील सुसंस्कृत नागरिकांनी साथ द्यायला हवी अशी केसरकरांनी सावंतवाडी वासीयांकडून अपेक्षा व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा