मंगळवारच्या बाजारात ताडपत्र्या बांधण्याचे परिणाम
संपादकीय…..
गेली अनेकवर्षं सावंतवाडीचा आठवडा बाजार शहर पर्यटनावर फिरत आहे, कधी गांधी चौक, कधी पांजरवाडा, उभाबाजार तर कधी सावंतवाडीची शान म्हणून ओळख असणाऱ्या ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर. सावंतवाडीचे मोती तलाव आणि त्याचे सौंदर्य पाहून अनेक पर्यटक आकर्षित होतात, दिवसा रात्री देखील त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. शिशिर ऋतू मध्ये पहाटे पडणारे धुके आणि त्यात हरवणारे मोती तलाव, सूर्याच्या सोनेरी किरणांची छटा पडताच उजळणारे मोती तलाव म्हणजे सौंदर्याची जणू खाण. पूर्वी विठ्ठल मंदिर पर्यंत विस्तीर्ण असणारे तलाव राजांच्या काळात बंदिस्त होत त्याला एक वेगळं रूप मिळालं. तेव्हापासून मोती तलाव हीच सावंतवाडी शहराची ओळख आणि शान बनली.
तलावाच्या कठड्याच्या जुन्या सिमेंटच्या जाळ्या काढून त्यावर कडप्पा, ग्रॅनाईट सारख्या फरश्या बसवून सभोवताली फायबर मोल्डेड रेखीव खांबांवर विद्युत रोषणाई करण्यात आली. दीपक केसरकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात तलावाचे सौंदर्य खुलले, विरोधकांनी तळ्याकाठचा विकास म्हणून खिल्ली उडवली परंतु शहराच्या सौंदर्यात त्यामुळे भर पडली आणि तलावाने शहरातून जाणाऱ्या पर्यटकांना भुरळ पडण्यास सुरुवात झाली.
गेली काही वर्षे सावंतवाडीचा आठवडा बाजार आणि त्याचे ठिकाण यावरून मतभेद झाले, गांधीचौकासहित बाजारपेठेत मंगळवारी बसणारा बाजार उभाबाजार विकासापासून वंचित राहतो, व्यापार होत नाही म्हणून आठवडा बाजार उभाबाजार येथे नेण्यात आला, पुन्हा काही व्यापाऱ्यांना भाजी बाजाराचा त्रास झाल्याने बाजार पांजरवाडा परिसरात हलविण्यात आला. दोन तीन वर्षे व्यवस्थित सुरू असणारा बाजार स्थानिक व्यापारी आणि परजिल्ह्यातील व्यापारी यांचा जागेच्या वादावरून पुन्हा प्रकाशात आला आणि जागेची कमी म्हणून नव्याने नगराध्यक्षपदी निवडून आलेले संजू परब यांनी आठवडी बाजार सौंदर्याची खाण म्हणणाऱ्या तलावाच्या काठावर आणला.
तलावाच्या काठाचे सुशोभीकरण करून सावंतवाडीच्या सौंदर्यात भर पाडण्यापेक्षा मंगळवारी बापूसाहेब महाराज पुतळ्यापासून शिवरामराजे महाराज पुतळ्यापर्यंत ताडपत्र्यांचे नकाशे लावून बाजारपेठ वसविली जाते. परंतु ताडपत्र्या बांधताना सदर व्यापारी भला मोठा राजू, सुभं कुठे बांधतात, मोठमोठ्या ताडपत्र्या उभारल्याने तलावाच्या काठावर किती आणि काय नुकसान होते याची पाहणी देखील करत नाहीत का? व्यापाऱ्यांकडून पावत्या वसूल करून नगरपालिका निधी गोळा करते, परंतु एक दिवस का होईना बांधलेल्या ताडपत्र्यांमुळे तलावाच्या काठाचे एक दिवस का विद्रुपीकरण होतेच परंतु तलावाच्या सुशोभीकरणासाठी लावलेले विद्युत दिवे दर मंगळवारी एक एक करून शेवटची घटका मोजत आहेत, प्रत्येक मंगळवारी एक खांब मुळासहित उन्मळून पडत आहे. बाहेरील व्यापारी आपल्या ताडपत्र्या, दोऱ्या सोडून घेऊन निघून जातात आणि उन्मळून, उखडून पडलेला खांब कठड्याच्या आधारावर टेकवून ठेवतात.
सत्ताधारी असो वा विरोधक, शासनाच्या आणि जनतेच्या पैशातून केलेल्या विकास कामांचे अशाप्रकारे नुकसान करू शकत नाहीत. शहरात चुकीचे काम होण्याच्या आधी विरोधक गप्प असतात आणि चुकीच्या कामांचे परिणाम दिसल्यावर येत्या निवडणुकीत लोक जाब विचारतील या भीतीपोटी चुकीच्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठविल्याने नाटक रंगवतात, अशीच काहिशी अवस्था विरोधी नगरसेवकांची झालेली सावंतवाडीत पहायला मिळते. येत्या काही दिवसात तलावाच्या काठावरील बरेचशे सुशोभित विद्युत खांब देह ठेवतील आणि त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांना जाग येईल, सावंतवाडीची जनता सुशिक्षित, सुज्ञ आहे, येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडी शहरवासीय याचा जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे ही तेवढेच खरे….