You are currently viewing एस टी कर्मचारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे सावंतवाडीत..

एस टी कर्मचारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे सावंतवाडीत..

नितेश राणेंच्या भेटीत महेश सारंग व संजू परब यांच्या मनोमिलनाची चर्चा

नारायण राणे यांचे समर्थक माजी पंचायत समिती सभापती व भाजपाचे महत्वाचे पदाधिकारी महेश सारंग आणि सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब हे दोघेही एकाच पक्षाचे लोकप्रतिनिधी… परंतु दोघांमध्ये मात्र सख्य नाही. एकाच पक्षात असूनही दोघे दोन विरुद्ध टोके अशीच स्थिती गेले काही महिने, वर्षे पहायला मिळाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याशी महेश सारंग यांची जास्त जवळीक. महेश सारंग आणि संजू परब तसे राजकारणातील हुशार व्यक्तीमत्व. कोलगाव मतदारसंघात आपल्या हुशारीने महेश सारंग यांनी भाजपाची मोट बांधली आहे. संपूर्ण सावंतवाडी मतदारसंघात देखील महेश सारंग यांनी आपली बऱ्यापैकी ओळख निर्माण केली आहे. नितेश राणे यांच्याशी देखील महेश सारंग यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे नितेश राणे येणार म्हटल्यावर महेश सारंग जणू नितेश राणेंचा उजवा हात असल्यासारखे नितेश राणेंच्या उजव्या बाजूस उभे होते.
संजू परब हे देखील भाजपाचे प्रवक्ते आणि सावंतवाडी नगराध्यक्ष म्हणून लोकांच्या पसंतीचे असलेलं नेतृत्व. माजी खासदार निलेश राणेंशी संजू परब यांची जवळीक. परंतु नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नितेश राणेंचा करिष्मा चालला आणि संजू परब निवडून आले होते. त्यानंतरच्या घडामोडीत नितेश राणे संजू परब यांच्यापासून काहीसे दुरावले होते. परंतु अलीकडेच नारायण राणे यांनी सावंतवाडी नगरपालिकेत भेट दिल्यानंतर नितेश राणे सावंतवाडीत आल्याने येत्या निवडणुकीत पुन्हा नितेश राणे सावंतवाडीचा गड राखण्याच्या तयारीत तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु भविष्यात होणारी नगरपालिका निवडणूक, जिल्हा बँक, विधानसभेची निवडणूक आदींच्या तयारीसाठी पक्षाचे मुख्य कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांची मोट बांधणे आवश्यक असल्याने महेश सारंग व संजू परब एकत्र येणे काळाची गरज आहे. सावंतवाडी तालुक्यात भाजपाला हुकूमत गाजवायची असेल तर एकही पदाधिकारी प्रक्रियेपासून अलिप्त राहता नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.
संजू परब यांच्या विनंतीवरून संजू यांच्या गृहप्रवेश झालेल्या बंगल्याच्या दिशेने जाताना आमदार नितेश राणे यांनी संजू व महेश दोघांनाही एकाच गाडीत बसविल्याने व बंगल्यात देखील दोघेही डावे उजवे बसल्यानंतर दोघात दिलजमाई झाल्याचे नितेश राणे यांनी बोलून दाखवले.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या दृष्टीने विचार केल्यास राजन तेली हे प्रमुख दावेदार असले तरी संजू परब देखील मागील दोन तीन वर्षे त्याची मोर्चेबांधणी करत आहेत, तर राजन तेली यांचा प्रचार करताना मागील निवडणुकीत महेश सारंग यांनी सपाट झालेल्या पिचवर आपणही ओपनिंग ला उतरू शकतो अशीच तयारी केली होती. सावंतवाडी मतदारसंघात भंडारी समाजाची असलेली ताकद आणि भंडारी बांधवांशी महेश यांचा असलेला दांडगा संपर्क यामुळे राजन तेली आणि संजू परब प्रमाणेच महेश सारंग देखील भविष्यात आमदारकीच्या निवडणुकीत आपली दावेदार सांगू शकतात आणि उमेदवारीची तयारी देखील करू शकतात. त्यामुळे आमदार नितेश राणेंच्या छोटेखानी दौऱ्यात डाव्या उजव्या बाजूस बसून झालेलं विलीनीकरण भविष्यात काय रंग दाखवतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =