You are currently viewing प्रेरणा अंतर्गत “यूपीएससी” साठी उद्या फेसबुक लाईव्ह

प्रेरणा अंतर्गत “यूपीएससी” साठी उद्या फेसबुक लाईव्ह

मुळचे सिंधुदुर्गचे  आणि मराठीतून उत्तीर्ण झालेले आयपीएस सुब्रमण्यम केळकर यांचे मार्गदर्शन

  सिंधुदुर्गनगरी

 यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रेरणा अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  आणि प्रेरणा अंतर्गत मुळचे जिल्ह्यातील चिंदर गावातील परंतु, सद्या तामिळनाडू येथे कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी सुब्रमण्यम भालचंद्र केळकर यांचे उद्या मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत मार्गदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे श्री. केळकर यांनी मराठी भाषेतून 2020 व 2021 या वर्षी युपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. उद्या होणाऱ्या या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे उपस्थित राहणार आहेत.

             श्री. केळकर यांचे शालेय शिक्षण चिंदरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून, मालवण येथील टोपीवाला महाविद्यालयातून त्यांनी 11 वी व 12 वीचे शिक्षण घेतले आहे. तसेच ओरोस येथील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल बिझीनेस मॅनेजमेंट मधून बीबीएमची पदवी संपादन केली आहे. वेलींगकर इंस्टीट्युट मधून पदव्युत्तर पदवी मिळविली असून, त्यांनी  इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्रामधून एम.ए ची पदवी मिळविली आहे. राज्यशास्त्रामध्ये  ते नेट जी आर एफ उत्तीर्ण झाले आहेत. 2020 मध्ये आय.पी.एस. झाले असून, सध्या तामीळनाडूमध्ये कार्यरत आहेत.

            यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे. हे मार्गदर्शन सत्र फेसबुकलाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-101061044850492  ऑनलाईन होत आहे.  यापूर्वी युपीएससी आणि एमपीएससी विषयी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा